तब्बल सहा फूट लांब केसांचा विक्रमः अपघातातून जिद्दीने विक्रमाकडे झेप
सांगली प्रतिनिधी
मुळची सांगलीची सुकन्या श्रद्धा सुदर्शन सदामते हिच्या सहा फुट लांबीच्या विक्रमी केसांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. सन २००५ मध्ये एका अपघातामुळे केशवपन करावे लागलेल्या श्रद्धाने आपले केस वाढवण्याचा विचार केला आणि तो जिद्दीने अंमलात आणत २००५ पासून केसांना कधीही कात्री न लावता चांगले ६ फुट केस वाढवले. त्याच जिद्दीचे फळ म्हणून तिच्या सहा फुटी केसांची नोंद इंडिया बुकने घेतली आहे.
सांगली विश्रामबाग येथे राहणारी श्रद्धा सदामते २०१२ पासून शिक्षण व लग्नानंतर पुण्यात स्थायिक आहे. सध्या ती स्वतःच्या आर्किटेक्चरल फर्म मध्ये आर्किटेक्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहे. त्याबरोबरच पेंटिंग आणि कॅलिग्राफीचा छंदही जोपासात आहे. व्यवसाय आणि कलेसाठी तिने नॅशनल लेव्हलवर पुरस्कार मिळवले आहेत. सन २००५ साली अकरावीत असताना तिचा दुर्देवाने एसटी अपघात झाला. त्यातून ती थोडक्यात बचावली, पण मेंदूला व पाठीला गंभीर दुखापत झाल्याने तिची ब्रेन सर्जरी करण्यात आली. यामध्ये तिचें संपूर्ण केशवपन करावे लागले. दुखापत झाल्याच्या वेदनेसोबत ऐन तारुण्यात केस गमावणे हे तिच्यासाठी अत्यंत वेदनादायी व धक्कादायक होते. अशा अवस्थेत स्वत:ला स्विकारणं तिच्यासाठी सोपं नव्हतं.ही दूखापत बरी होण्यासाठी बरीच वर्षे लागली. दीड वर्षे तिने आरसा पाहिला नाही. शारीरिकदृष्ट्या बरं होण्यासाठी तीन वर्षे लागली. पण गेलेला आत्मविश्वास मिळवायला बराच कालावधी लोटला. यावेळी घरच्यांनी तेव्हा दिलेला आधार आणि त्यांचं खंबीरपणे पाठीशी उभं राहणं हेच औषधाचं काम करत होतं. अशाही परिस्थितीतून पुढे हार न मानता तीने १२ वी नंतर आर्किटेक्चर ग्रॅज्युएशन सांगलीत केले. तर आर्किटेक्चर कोर्समधील मास्टर्स डिग्रीसाठी ती पुण्यास गेली. जवळजवळ १६ वर्ष एकेक एम-एम केस वाढताना ती बघत आलीय. तेव्हापासून तिची केसांना कात्री लावायची इच्छा झालीच नाही.
श्रद्धाला त्याचे फळ आता मिळाले असून, ६ फूट लांब केसांसाठी तिची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. भारतातल्या सर्वात लांब केस असलेल्या महिलांमध्ये तिचे नाव नोंद झाले आहे. तिची बहीण डॉ. पूजा सदामते- नागराल ही ‘हवा येऊ द्या-होवू द्या व्हायरल’ ची उपविजेती आहे. बहिणीसह आई लता सदामते, वडील सुदर्शन सदामते व भाऊ श्रेयस यांचं पाठबळ तिला वेळोवेळी मिळत आहे. त्या बळावरच ती जिद्दीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.