बेळगाव प्रतिनिधी – येळ्ळूर येथील परमेश्वर नगर येथे असलेले सरापी दुकान फोडून आठ किलो चांदी चोरून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री २.४५ च्या सुमारास घडली. त्याचबरोबर शिवाजी रोड येथील जिजाऊ मेडिकलचे उचकटून आत जाण्याचा प्रयत्न केला. गावच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले इंडियन गॅस चे कार्यालय ही फोडले आहे मात्र दोन्ही ठिकाणी चोरट्यांना काहीही सापडले नाही.
अवचारहट्टी रोडवरील घरासमोर लावलेली दुचाकी ही चोरट्यांनी लांबवली आहे. या घटनेमुळे येळ्ळूर परिसरात खळबळ उडाली आहे.
परमेश्वर नगर येथे बालाजी ज्वेलर्स सराफी दुकानांमध्ये चोरट्याने प्रवेश केला यावेळी चांदीच्या सर्व वस्तू त्यांनी घेतल्या या दुकानाच्या पाठीमागे राहणारे प्रवीण सायनेकर यांनी आपले नातेवाईक विनय संभाजी यांना मुलाला दवाखान्याला न्यायला पाहिजे तुम्ही या असे सांगितले. विनय संभाजी हे दुचाकी घेऊन आले त्यावेळी त्यांना सराफी दुकानांमध्ये आवाज आला त्यांनी तिथे कोण आहे असे विचारले ? त्यावर चोरट्याने आपल्या हातातील कुलूप त्यांच्या दिशेने फेकला. सुदैवाने तो कानाजवळ पुसदसा लागून बाजूला गेला त्यानंतर त्यांनी आरडाओरड केला त्यामुळे चोरटे जवळच पार्किंग केलेल्या दुचाकीवरून पसार झाले.
https://tarunbharat.com/horrible-murder-of-astrologer-at-halga/
या घटनेनंतर तातडीने सराफी व्यावसायिकाला फोन केला त्यानंतर या घटनेची माहिती बेळगाव ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस ४ वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला या घटनेनंतर शिवाजी रोड येथील जिजाऊ मेडिकल ही फोडण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. ही घटना उघडकीस येते तोपर्यंत गावच्या प्रवेशद्वारा जवळ असलेले इंडियन गॅस कार्यालय फोडण्यात आल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश करून तिजोरी तसेच इतर कपाटातील साहित्य विस्कटून टाकले, चोरट्यांना मात्र हाती काहीच लागले नाही. या घटनांमुळे येळ्ळूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी या घटनांची फिर्याद दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.