आरोग्यास धोकादायक असूनही दुर्लक्ष : राजस्थान, गुजरातहून येतोय कच्चा माल,दूध, साखराचे दर वाढले तरी पेढे स्वस्त कसे?,अन्न व औषध प्रशासन करवाई करणार कधी?

प्रतिनिधी /पणजी
काही परप्रांतीय दुकानांतून मिळणारे पेढे खाणे आरोग्यास धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. यासंदर्भात एक ऑडियो हाती सापडला असून त्यात दोन दुकानदारांनी आपल्याला माल कुठून मिळतोय याबाबतची माहिती उघड केली आहे.
गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर काही राजस्थानी मिठाई दुकानावर रु. 300 प्रति किलो पर्यंतच्या दरात कसे काय पेढे विकले जातात? हा प्रश्न अनेकांना पडला. प्रत्यक्षात गोव्यातील अनेक नामवंत मिठाई दुकानांवर पेढय़ांचा दर रु. 600 व त्याहीपेक्षा जास्त आहे. कारण पेढे करणे व त्यासाठी लागणारा कच्चा माल यांचे दर गगनाला भिडले असल्याने चांगला पेढा हा रु. 600 पेक्षा जास्त दराने विकणेच उत्पादकाला परवडते. असे असताना काही परप्रांतीय मिठाई विक्रेते रु. 280 प्रतिकिलोच्या दराने पेढे विकतात. अनेकजण हे पेढे वा खव्याचे मोदक गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवितात. प्रत्यक्षात अद्याप अन्न व औषध संचालनालयाने त्या विरुद्ध कारवाई का केली नाही? हाच मुळात प्रश्न उपस्थित झाला आहे.
‘स्वीट हलवा’चा वापर, आरोग्यास अपायकारक
या संदर्भात प्राप्त माहितीनुसार, अनेकजण पेढे तयार करण्यासाठी जो मावा वापरतात त्याच्या मोठाल्या पोत्या विक्रीस आल्या आहेत. म्हापसा येथील एक घाऊक विक्रेता सर्वांना या पोत्या देतो. त्यात दुधाच्या नव्हे तर पामतेलाचा वा वनस्पती तेलाचा वापर व दूध पावडरीचा वापर करुन मावा तयार केला जातोय. त्याला ‘स्वीट हलवा’ असे संबोधले जाते. यामध्ये दूध पावडर, वनस्पती तेल याशिवाय फूड प्रिझरवेटिव्हजचा वापर तसेच त्यात रंगही टाकला जातोय. प्रत्येकी 30 किलोचे पोते मिळतेय. त्यातून हे तथाकथित पेढे तयार केले जातात. तथाकथित पेढे तयार करणाऱया व्यक्तीला ते रु. 150 ते रु. 180 प्रति किलो या दराने पडते. ते गरम करुन त्याचे तयार केलेले गोळे म्हणजेच पेढे व हे पेढे खरोखरच आरोग्याला अपायकारक तर ठरणार नाहीत? याची ग्वाही कोण देणार?
दुधाचे दर वाढले, तरी पेढे 280 रु. किलो कसे?
गोव्यात सध्या गाईचे दूध प्रतिलिटर 50 ते 60 रु. असे आहे तर म्हशीचे दूध रु. 60 ते 70 असे आहेत. 3 लिटर दुधापासून 1 किलो पेढे होतात. त्यात साखर, दूध आटवायला गॅस, शिवाय कामगार वगैरे खर्च पाहता शुद्ध पेढे रु. 600 च्या खाली प्रतिकिलो विकणे कोणाला परवडत नाही. या परप्रांतिय विक्रेत्यांना रु. 280 च्या दराने पेढे विक्री करणे कसे परवडते? दुधाच्या खव्यापासून मिठाई बनविली जाते ती देखील स्वस्तात कशी परवडते याचे गुढ आता उघड झाले आहे.
अन्न व औषध संचालनालय कारवाई करणार का?
राज्यातील जनतेला सावध करण्यासाठी या संदर्भातील काही माहिती दै. ‘तरुण भारत’पर्यंत सामाजिक कार्यकर्त्यांनी पोहोचविली. ऐन गणेशचतुर्थीच्या तोंडावर पेढे व मावा, खव्याच्या नावाखाली जी कोणी बनावटगिरी करु पाहत आहे त्यावर आता अन्न व औषध संचालनालय कारवाई करणार का? राज्यातील बरीच मिठाईची दुकाने तपासण्याची गरज आहे. त्याचबरोबर ‘खवा’, ‘मावा’ या नावाखाली जो माल गुजरात, राजस्थानमधून गोव्यात येतोय त्याचीही तपासणी होणे गरजेचे आहे. मउशार पेढा हलकाच हाती घेण्यास बरा वाटतो परंतु, या सर्वच परप्रांतिय दुकानातून मिळणारा पेढा, वा दुधाच्या पदार्थांची चव एकसारखीच असते याचे कारण दूध आटवून पेढे नाही केले जात. त्यामुळे जनतेने असे पेढे सेवन करणे हे देखील आरोग्यास धोकादायक ठरु शकते. गोवा सरकार यावर कारवाई करणार काय?









