राष्ट्रीय पक्षांनी 2004-20 दरम्यान मिळविले 15 हजार कोटी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील राजकीय पक्षांसंबंधी एडीआरच्या अहवालातून चकित करणारी माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय पक्षांनी 2004-2020 दरम्यान अज्ञात स्रोतांमधून 15 हजार 77 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मिळविला आहे. अज्ञात स्रोतांकडून निधी मिळविण्यात काँग्रेस पक्ष सर्वात आघाडीवर आहे. 2020-21 या वर्षात अज्ञात स्रोतांकडून राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना एकूण 690.67 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.
राष्ट्रीय पक्षांमध्ये भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, माकप, राष्ट्रवादी काँग्रेस, बसप, भाकप, नॅशनल पीपल्स पार्टी सामील होती. तर प्रादेशिक पक्षांमध्ये आप, एजीपी, अण्णाद्रुमक, एआयएफबी, एआयएमआयएम, एआययूडीएफ, बीजद, सीपाआय माले, द्रमुक, संजद, धजद, झामुमो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एनपीएफ, शिवसेना, अकाली दल, टीआरएस, वायएसआर काँग्रेससह अनेक प्रादेशिक पक्ष सामील आहेत.
काँग्रेसने 2020-21 या आर्थिक वर्षात अज्ञात स्रोतांकडून 178.78 कोटी रुपये प्राप्त केले आहेत. तर भाजपला अज्ञात स्रोतांकडून 100 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. प्रादेशिक पक्षांमध्ये वाएसआय काँग्रेसला 96 कोटी रुपये, द्रमुकला 80 कोटी, बीजदला 67 कोटी, मनसेला 5 कोटी, ‘आप’ला 5.4 कोटी रुपये अज्ञात स्रोतांकडून प्राप्त झाले आहेत.









