रत्नागिरी प्रतिनिधी
गणेशोत्सवानंतर जिल्ह्यातील बागायतदारांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक आयोजित करुन कोकणातील बागायतदारांना न्याय देण्यासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबतच सभागृहात आंबा बागायतदारांच्या अडीअडचणींबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र विद्या कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, तहसीलदार (महसूल) तेजस्विनी पाटील, पणन विभागाचे मिलींद जोशी, लीड बँकेचे मॅनेजर एन.डी. पाटील, आंबा बागायतदार काका मुळे आदी उपस्थित होते.
यावेळी सामंत म्हणाले, आंबा बागायतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेवून मार्ग काढू याकरीता सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आंबा कॅनिंगचा हमीभाव ठरवण्यासाठी पणन विभाग, कृषी विद्यापीठ व आंबा बागायतदार यांनी चर्चा करावी. काजू बोंडाना अल्कोहोल व वायनरीची मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांने काजू बी सोलण्याचे यंत्र विकसित केले आहे. त्याचा पेटंटही मिळाला आहे. हे यंत्र खरेदीसाठी सिंधुरत्न योजनेतंर्गत शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा प्रस्ताव मांडण्यात येईल असे मंत्री महोदयांनी सांगितले.