सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समिती अक्रमक : ग्रामीण भागातील तोट्य़ातील मार्ग बंदसाठी 12 सप्टेंबरची डेडलाईन
प्रतिनिधी/कोल्हापूर
एकीकडे महापालिकेच्या सेवा घ्यायच्या आणि दुसरीकडे हद्दवाढीला विरोध करायचा अशी दुटप्पी भूमीका हद्दवाढीतील गावांची आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील तोटय़ातील मार्गावरील बस बंद करण्याची मागणी सहा महिन्यांपूर्वी केली होती. यावर कार्यवाही झालेली नाही. 12 सप्टेंबरपर्यंत या बस बंद झाल्या नाही तर वर्कशॉपमधून एकही बस बाहेर सोडणार नाही, असा इशारा सर्वपक्षीय शहर हद्दवाढ कृती समितीच्यावतीने गुरूवारी केएमटी प्रशासनाला देण्यात आला.
ऍड. बाबा इंदूलकर म्हणाले, ज्यांच्या मागणीवरून हद्दवाढीतील गावांत बस सुरू केल्या, त्यांनी एक साधे पत्र पाठवून केएमटीचे आभार मानले नाहीत. या उलट हद्दवाढीची भूमीका सांगण्यासाठी गावात गेल्यानंतर हेच ग्रामस्थ महापालिकेचा कोणताच लाभ घेत नसल्याचे ठणकावून सांगतात. त्यामुळे तत्काळ तोटय़ातील केएमटी बंद करा अन्यथा केएमटी कार्यालयासमोर निदर्शने करू. दिलीप देसाई म्हणाले, पुणे महापालिकेच्या भंगार बस केएमटी प्रशासन का खरेदी करत आहे. शहरातील करातून या बस खरेदी करणार आणि हद्दवाढीला विरोध करणाऱयांसाठी वापर करणार असेल तर खपवून घेणार नाही.
बाबा पार्टे म्हणाले, ग्रामीण भागातील तोटय़ातील एकही मार्ग सुरू असता कामा नये. 12 सप्टेंबरपर्यंत सर्व मार्गावरील बस बंद झाली पाहिजे. अन्यथा वर्कशॉपमधून एकही बस बाहेर सोडणार नाही. यावर परिवहन व्यवस्थापक टिना गवळी यांनी तोटय़ातील बस टप्प्याटप्याने बंद केल्या जातील. त्याचा प्रस्ताव त्वरीत प्रशासकाकडे पाठवू, अशी ग्वाही दिली. आपचे संदीप देसाई, ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई यांनी केएमटी प्रशासनाचा खरपूस शब्दात समाचार घेतला. यावेळी माजी नगरसेवक अशोक भंडारे, महादेव पाटील, निशिकांत सरनाईक आदी उपस्थित होते.
कोणाच्या सांगण्यावरून मार्ग सुरू ठेवले
सहा महिन्यांपूर्वी मागणी करूनही तोटय़ातील मार्ग बंद का केले नाहीत. कोणाच्या सांगण्यावरून हे मार्ग सुरू ठेवले. केएमटी कर्मचारी नेमके कोणाच्या बाजूने आहेत. पगार घेणार शहरातील जनतेच्या करातून आणि काम करणार हद्दवाढीला विरोध करणाऱयांसाठी असे चालणार नाही. असेही इंदूलकर यांनी ठणकावून सांगितले.
परिवहन व्यवस्थापक धारेवर
परिवहन व्यवस्थापक टिना गवळी यांनी आपण नुकतेच केएमटीत रूजू झाले असून प्रभारी चार्ज असल्याने निर्णय घेत येत नसल्याचे सांगितले. यावर कृती समितीचे कार्यकर्ते त्यांच्यावर भडकले. पदभार घेऊन तीन महिने झालेत केएमटीसाठी आतापर्यंत काय केले असा सवाल ऍड, इंदूलकर यांनी केला.
मग 10 हजार खर्च का केला
नादुरूस्त बस दुरूस्तीसाठी लाखो रूपये खर्च होत आहेत. अशातच पुणे महापालिकेच्या जुन्या बस घेतल्याने तोटय़ात आणखी वाढच होणार आहे. या बस घेणार नव्हता तर पाहणीसाठी अधिकाऱयांनी 10 हजार खर्च का केले, असा सवालही कृती समितीने उपस्थित केला.