ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ऑनलाईन कर्ज देण्याच्या आमिषाने लोकांना जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक करणारे 2000 ॲप्स गुगलने प्ले स्टोअर्सवरून हटवले आहेत. या ॲप्सकडून नियम आणि अटींचे उल्लंघन होत असल्याचा ठपका गुगलने ठेवला आहे.
गुगलचे एशिया पॅसिफिक क्षेत्राचे वरिष्ठ संचालक सॅकत मित्रा म्हणाले, गुगल नेहमीच युजर्सच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा आणि सायबर गुन्हे रोखण्याचा प्रयत्न करते. मात्र, काही लोन ॲप्सकडून नियम आणि अटींचे उल्लंघन करत लोकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले. लोकांना कर्ज दिल्यानंतर हे ॲप त्यांच्याकडून 200 टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारत होते. या ॲप्सच्या कर्जाच्या जाळय़ात अडकून अनेकांनी आत्महत्याही केल्याचं समोर आलं आहे.
अधिक वाचा : डिसेंबर अखेरपर्यंत पालिका निवडणूक
या ॲप्सच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर भारतीय रिजर्व्ह बँकेने नागरिकांना या अनोंदणीकृत लोन ॲप्सपासून सावध राहण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान, गुगलने जानेवारी महिन्यापासून प्ले स्टोअरवरुन 2000 हून अधिक बनावट लोन ॲप्स हटवले आहेत. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारसोबत मिळून आम्ही उपाययोजना करत आहे.