पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचा आहे का, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विधानसभेतील राडय़ावरून गुरुवारी संताप व्यक्त केला.
मनसेच्या प्राथमिक नावनोंदणीला ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात सुरुवात झाली. त्या वेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने मनसेने शहर कार्यालयाच्या बाहेर मोठी बॅनरबाजी केली आहे. ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ अशी टॅगलाइन या बॅनरवर पाहायला मिळत आहेत. या वेळी त्यांनी स्वत:देखील पक्षात नोंदणी केली. त्यावेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात असे कधी घडले नव्हते. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. महाराष्ट्राची परंपरा, इतिहास वेगळा आहे. आपल्याला महाराष्ट्राचा यूपी किंवा बिहार करायचा आहे का? निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी असे वागणे चुकीचे आहे.
अधिक वाचा : डिसेंबर अखेरपर्यंत पालिका निवडणूक
प्रभाग रचनेवरून पुन्हा एकदा टीका
प्रभाग रचना तीन किंवा चारची केल्यामुळे काम करण्यास अडचणी येतात. प्रभागातील सदस्य संख्या वाढवण्याचे काम पहिल्यांदा राष्ट्रवादीने केले. प्रभाग रचना सातत्याने बदल्याने नगरसेवकांना काम करता येत नाही, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. एका प्रभागात एकापेक्षा जास्त नगरसेवक हवेतच कशाला, असा आक्षेप कालच त्यांनी आपल्या भाषणातून मांडला होता. आज पुन्हा त्यांनी प्रभागरचनेवरून टीका केली.
सर्वांनी मनसेचे सभासद व्हावे
आत्तापर्यंत सदस्य नोंदणी सुरुवात ही मुंबईत करण्यात आली होती. प्रथमच ती पुण्यात करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार दर तीन ते चार वर्षांनी नाव नोंदणी करण्यात येते. महाराष्ट्रातील सर्वांना मी आवाहन करतो, की सर्वांनी मनसेचे सदस्य व्हावे. जे सदस्य होतील, त्यांना दर आठवडय़ाला पक्षाची माहिती, कार्यक्रम, विविध विषय याबाबतची माहिती त्यांच्या मोबाईलवर देण्यात येईल, असेही ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.
आता भारत नाही, हिंदूंचा हिंदुस्थान
दुसरीकडे पुण्यातील मनसेचे पोस्टरही चर्चेचा विषय ठरले आहे. या पोस्टरवरही राज ठाकरे यांचे भगवी शाल घेतलेले छायाचित्र झळकत असून, त्यावर हिंदूजननायक, असा उल्लेख केला आहे. तर आता भारत नाही, हिंदूंचा हिंदुस्थान, हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी, असाही मजकूर आहे. मनसेच्या या घोषवाक्यावरून पक्षाने हिंदुत्वाचे कार्ड अधिक जोरकसपणे पुढे केल्याचे दिसत आहे.