पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील महापलिका निवडणूक लवकर व्हाव्यात, हीच आमची ईच्छा आहे. पण आधीच्या ठाकरे सरकारने प्रभाग बदलले आणि सगळा गोंधळ झाला. त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. आधीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाने अनेक अडचणी आल्या. पण आता शिंदे सरकार सगळय़ा गोष्टी नीट करत आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातील महापालिकेच्या निवडणुका होतील, अशी शक्यता रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी वर्तविली.
बालगंधर्व रंगमंदिरात रिपाइंचा मेळावा झाला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आठवले म्हणाले, आधी शिवसेना ही भाजप आणि आरपीआयसोबत होती, पण मधल्या काळात आमच्यापासून दूर गेली. आता खरी शिवसेना आमच्या सोबतच आहे. आम्ही एकनाथ शिंदे गट आणि भाजपसोबत युती करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार आहोत. आम्हाला अधिक जागा मिळाव्या आणि सत्तेत देखील वाटा मिळावा, यासाठी मी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचाय का?, विधानसभेतील राड्यावरून राज ठाकरेंचा संताप
आम्ही आहोत पक्के
विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून रोज नव्या घोषणा दिल्या जात आहेत. त्यावरही भाष्य करताना रामदास आठवले यांनी कवितेच्या चार ओळी ऐकवल्या. ते म्हणतायत् ‘50 खोके, एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के, आम्ही आहोत पक्के’, अशा चारओळीच आठवले यांनी ऐकवल्या.
सरकार पडणार नाही
विरोधक आमचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र तुम्ही काही केले तरी आमचे सरकार पडणार नाही. येणाऱया सगळय़ा निवडणुकीत आम्ही निवडून येऊ आणि सरकार स्थापन करू. हे विरोधक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.
दलितांवरील अत्याचार रोखणार
पक्ष बांधणीसाठी हे संमेलन होते. आणखीन पदे लवकरच निवडण्यात येणार आहेत. आज दलित पँथरचा स्थापना दिवस पुण्यात होत आहे. संपूर्ण राज्यभर आम्ही अंनेक कार्यक्रम राबवत आहोत. दलितांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आम्ही संघर्ष करणार आहोत, असे आठवले यांनी यावेळी नमूद केले.
ब्राह्मण समाजाला आरक्षण द्या
ब्राह्मण संघाच्या आनंद दवे यांची भेट झाली. अमृत योजनेबद्दल चर्चा झाली. ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल लोकांना आरक्षण मिळायला हवे, ही मागे मागणी केली होती. याचा विचार आता पुन्हा नक्की करण्यात येईल. मराठा समाजाला जसे आरक्षण दिले, तसेच ब्राह्मण समाजालाही आरक्षण दिले पाहिजे, ही मागणी मी सर्वात आधी केली होती, असेही त्यांनी यावेळी सांगितले.