केंद्रीय विधि व न्याय राज्यमंत्री सत्यपालसिंग बघेल; खासदार धनंजय महाडिक यांच्याशी विकासकामांवर चर्चा
कोल्हापूर प्रतिनिधी
केंद्र शासनाशी संबंधित असलेले कोल्हापूर जिह्यातील प्रलंबित प्रश्न आणि विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय विधी न्याय राज्यमंत्री सत्यपालसिंग बघेल यांनी दिली.
कोल्हापूर दौऱयावर आलेल्या मंत्री बघेल यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांच्या कोल्हापूरच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. कोल्हापूर जिल्हयाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी संसदेमध्ये पाठपुरावा करण्याबरोबरच शेतकरी, साखर कारखानदार, वाहतुकीचे प्रश्न यासारख्या विविध महत्वपूर्ण मुद्दयांवर खासदार महाडिक उल्लेखनीय चर्चा घडवून आणत असल्याबद्दल बघेल यांनी गौरवोद्गार काढले. सौ. अरूंधती महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, विश्वराज महाडिक, सत्यजीत कदम उपस्थित होते.
सर्किट बेंचच्या मागणीकडे वेधले लक्ष
मंत्री बघेल यांच्याबरोबरच्या चर्चेत खासदार महाडिक यांनीं कोल्हापूर जिह्याच्या विविध विकास कामांबाबत मांडणी केली. प्रामुख्याने सर्किट बेंचचा प्रश्न महत्वाचा आहे. सर्कीट बेंच झाल्यास ५ जिल्हयातील हजारो पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. याकडे खासदार महाडिक यांनी लक्ष वेधले.