ऑनलाईन टीम/तरुण भारत
Income Tax Department Raid : उद्योजक अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांच्या पंढरपूरसह राज्यातील ४ साखर कारखान्यांवर आयकर विभागाने (Income Tax Department) छापेमारी केली. सकाळी साडेसहापासून या कारखान्यांची झाडाझडती सुरू आहे. अभिजीत पाटलांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बड्या नेत्याचं पाठबळ असल्याचं बोललं जात आहे. या बड्या नेत्याला या कारवाईतून लक्ष्य केलं जात असल्याची चर्चा सुरु आहे. अभिजीत पाटील हे पंढरपूर येथील असून ते साखर सम्राट म्हणून गेल्या १० वर्षात ओळखले जात आहेत. (income tax department raids 4 sugar mills of industrialist abhijeet patil)
चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. पहाटेपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई सुरू आहे. अभिजीत पाटील चेअरमन असलेल्या कारखान्यावर धाडी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. अभिजीत पाटील हे पंढरपूर येथील असून ते साखर सम्राट म्हणून गेल्या १० वर्षात ओळखले जात आहेत.
हे ही वाचा : मनीष सिसोदियांवर सीबीआयचे छापासत्र
अभिजीत पाटील पंढरपूरमधील एक मोठे उद्योजक आहेत. पंढरपुरात त्यांची साखर सम्राट म्हणून ओळख आहे. दरम्यान, अभिजीत पोटील यांनी काही वर्षातच राज्यातील ४ खासगी साखर कारखाने विकत घेतले होते. अल्पावधीत साखर उद्योगातील ही प्रगती पाहून याबाबत कायमच उलट सुलट चर्चा सुरु होत्या. तर अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील २० वर्षांपासून बंद पडलेला कारखाना चालवायला घेऊन गेल्या वर्षी तो यशस्वीपने चालवून दाखवला आहे.
अभिजीत पाटलांकडे सध्या कोणते साखर कारखाने?
सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना (पंढरपूर, सोलापूर)
धाराशीव साखर कारखाना, चोरखडी (उस्मानाबाद)
धाराशीव साखर कारखाना युनिट २ (लोहा, नांदेड)
वसंतदादा साखर कारखाना विठेवाडी, चांदवड, नाशिक
विठ्ठल साखर कारखाना निवडणूकीत विजय –
पंढरपूर तालुक्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली. यामध्ये अभिजित पाटलांनी मोठा विजय संपादन केला. त्यांनी राष्ट्रवादीचे भगिरथ भालके, कल्याण काळे आणि भाजप खासदार मुन्ना महाडिक यांच्या सारख्या दिग्गजांच्या पॅनल पराभूत केले. नवख्या उमेदवारांना घेऊन पाटील यांनी ही निवडणूक लढवली होती. त्यांच्याकडे उस्मानाबाद, नाशिक, नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यात ४ कारखाने आहेत. या विजयासह पाटील यांनी पाचवा कारखाना आपल्या हाती घेतला आहे.