उपसरपंचपदाची माळ तन्वी सावंत यांच्या गळय़ात
प्रतिनिधी /डिचोली
मये मतदारसंघातील कारापूर सर्वण या पंचायतीच्या सरपंचपदी दत्तप्रसाद खारकांडे यांची तर उपसरपंचपदी तन्वी सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पंचायतीवर भाजपने निर्विवाद आपला झेंडा फडकविला आहे.
पंचायत कार्यालयात सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक झाली. यावेळी पंचसदस्य दत्तप्रसाद खारकांडे, तन्वी सावंत, ज्ञानेश्वर बाले, अवनी (बिंदिया) सावंत, सुकांती खारकांडे, लक्ष्मण गुरव, दामोदर गुरव, उज्ज्वला कवळेकर, दिव्या नाईक, योगेश पेडणेकर, बीबी आयेशा मागोडकर, निवडणूक निरीक्षक म्हणून सागर च्यारी, प्रशासक नवनाथ आमरे, सचिव सुजाता मोरजकर यांचीही उपस्थिती होती.
मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या सहकार्याने या पंचायतीत विविध कामे हाती घेतली जाणार आहेत. पंचायतीतील सर्व अकराही पंचसदस्य संघटित काम करणार, असे यावेळी नवनिर्वाचित सरपंच दत्तप्रसाद खारकांडे यांनी सांगितले. नूतन उपसरपंच तन्वी सावंत यांनी यावेळी, कारापूर सर्वण पंचायत क्षेत्रात कचऱयाची समस्या जटिल बनत असून त्यावर ठोस उपाययोजना आखण्यासाठी योग्यते नियोजन केले जाईल, असे स्पष्ट केले. आमदार प्रेमेंद्र शेट, मंडळ अध्यक्ष दयानंद कारबोटकर यांनी या पंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व पंचायत मंडळाचे अभिनंदन केले.









