भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची घोषणा
लंडन / वृत्तसंस्था
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोनाबाधित असल्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे सर्वेसर्वा व्हीव्हीएस लक्ष्मण आगामी आशिया चषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचे अंतरिम प्रशिक्षक असतील, अशी घोषणा मंडळाचे सचिव जय शाह यांनी केली. द्रविड सध्या आयसोलेशनमध्ये असून कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर ते संघात दाखल होऊ शकतील. आगामी आशिया चषक स्पर्धा दि. 27 ऑगस्ट रोजी सुरु होत असून भारताचा सलामीचा सामना रविवार दि. 28 रोजी पाकिस्तानविरुद्ध रंगणार आहे.
‘राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय वरिष्ठ संघाचे अंतरिम प्रशिक्षक म्हणून आशिया चषक स्पर्धेत काम पाहतील. लक्ष्मण यापूर्वी झिम्बाब्वेत भारतीय संघाने खेळलेल्या वनडे मालिकेत प्रशिक्षण पथकात समाविष्ट होते. द्रविडच्या गैरहजेरीत लक्ष्मण संघाची तयारी करवून घेतील’, असे शाह यांनी यावेळी नमूद केले.
लक्ष्मण आता उपकर्णधार केएल राहुल, दीपक हुडा, अवेश खान यांच्यासह भारतीय पथकात दाखल होतील. केएल राहुल, हुडा व अवेश झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिका संपन्न झाल्यानंतर तेथूनच परस्पर युएईला रवाना झाले.









