प्रतिनिधी/ बेळगाव
सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या संगीत भजन स्पर्धेच्या दुसऱया दिवशी सात भजनी मंडळांनी एकापेक्षा एक सुंदर भजनांचे सादरीकरण केले. खानापूर रोड येथे मराठा मंदिराच्या सभागृहात या स्पर्धांना प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी हभप एस. बी. ओऊळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले. वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी भजन स्पर्धा भरविण्याचा उद्देश स्पष्ट केला.
पहिल्या दिवशी एकूण पाच भजनी मंडळांनी भजने सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. दुसऱया दिवशी म्हणजेच मंगळवारी एकूण सात संघांनी भजन, गवळण सादर केल्या. त्यामध्ये कचेरी गल्ली, शहापूर येथील स्वरगंधा भजनी मंडळ, बेळवट्टी महालक्ष्मी भजनी मंडळ, बाकनूर येथील धन्य ते माता पिता बाल भजनी मंडळ, वडगाव येथील ज्ञानेश्वरी माऊली भजनी मंडळ, काटगाळी (ता. खानापूर) येथील महालक्ष्मी भजनी मंडळ, खासबाग येथील क्रांती महिला भजनी मंडळ, भाग्यनगर येथील चिन्मय भजनी मंडळ यांनी आपली कला सादर केली. प्रारंभी डॉ. विनोद गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
या स्पर्धेत बेळगाव, खानापूर आणि चंदगड तालुक्मयातील भजनी मंडळांचा सहभाग आहे. पुरुष गटात 17 तर महिला गटात 16 अशा 33 भजनी मंडळांनी भाग घेतला आहे. शुक्रवार दि. 26 ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. बुधवार दि. 24 रोजी 8 भजनी मंडळांचे भजन सादर होणार आहे.









