वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्षानिमित्त दुसऱया लिजेंडस् लिग क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सदर स्पर्धा सप्टेंबर महिन्यात खेळविली जाईल. या स्पर्धेतील तीन सामन्यांचे यजमानपद कोलकाता शहर भूषविणार आहे. इंडियन महाराजा आणि विश्व जायंट्स या दोन संघांमधील सामने कोलकाता येथे होतील. प्ले ऑफ गटातील सामन्याचे ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
दुसऱया लिजेंड्स लिग 2022 च्या क्रिकेट स्पर्धेतील सामने कोलकाता, नवी दिल्ली, कटक, लखनौ आणि जोधपूर या शहरांमध्ये होणार आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर 16 ते 18 सप्टेंबर या अवधीत तीन सामने खेळविले जाणार असून त्यामध्ये अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त इंडियन महाराजा आणि विश्व जायंटस् यांच्यातील प्रदर्शनीय सामन्यांचा समावेश आहे. जोधपूर आणि लखनौ येथील मैदानावर प्रत्येकी दोन सामने खेळविले जातील. या स्पर्धेतील अंतिम सामना डेहराडून येथे खेळविण्याची शक्यता आहे. या स्पर्धेला शौकिनांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा लिजेंडस् लिग क्रिकेट स्पर्धेचे आयुक्त रवी शास्त्री यांनी व्यक्त केली आहे. या स्पर्धेमध्ये विविध देशांचे माजी क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत.









