‘ऑफर’च्या दाव्यानंतर दिल्लीत राजकीय वातावरण तत्प
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीत मद्य धोरणावरून राजकीय संघर्ष सुरू आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या भाजपच्या ऑफरच्या वक्तव्यावरून राजकीय खळबळ उडाली आहे. सिसोदिया यांच्या आरोपांवर भाजपने आम आदमी पक्षाकडे पुराव्यांची मागणी केली आहे. तुम्ही आरोप करत असाल तर पुरावेही द्या, असे भाजपने म्हटले आहे. दुसरीकडे, भाजपचे नेते ‘आप’च्या आमदारांना प्रत्येकी 5 कोटी रुपयांची ऑफर देत आहेत. मात्र, तरीही दिल्लीत ऑपरेशन लोटस यशस्वी झालेले नाही, असा दावा आपचे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने टाकलेल्या छापेमारीनंतर आम आदमी पार्टी (आप) सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहे. ‘ऑफर’संबंधीचा व्हिडीओ आमच्याकडेही आहे आणि वेळ आल्यावर तो प्रसिद्ध करू, असे आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज पत्रकार परिषदेत म्हणाले. तसेच भाजपला दिल्लीतील सरकार पाडायचे असल्याने मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
सोमवारी गुजरातमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आमच्या नेत्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला, पण ऑपरेशन लोटस अयशस्वी ठरले. सीबीआय-ईडी भ्रष्टाचाराची चौकशी करत नाही तर सरकार पाडण्यासाठी छापे टाकते. महाराष्ट्र-कर्नाटक आणि मध्य प्रदेशपाठोपाठ आता दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांचे सरकार त्यांना पाडायचे आहे, असेही ते म्हणाले होते.









