गणेशोत्सवापूर्वी तत्काळ उपाययोजना करा
प्रतिनिधी/ चिपळूण
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या व निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामाबाबत रायगड व रत्नागिरी जिल्हय़ातील खासदार, आमदारांची सोमवारी नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी झालेल्या बैठकीत या महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा आढावा घेतानाच गणेशोत्सव जवळ आलेला असल्याने महामार्गाची त्वरित डागडुजी करून गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याची मागणी केली गेली.
या बैठकीत खासदार विनायक राऊत, सुनील तटकरे. आमदार प्रविण दरेकर. शेखर निकम, राजन साळवी, योगेश कदम, वैभव नाईक. रवी पाटील, भरत गोगावले, आदिती तटकरे, अनिकेत तटकरे, बाळाराम पाटील यांच्यासह राजन तेली, दीपक पटर्वधन आदींनी या महामार्गाची सध्यस्थिती मंत्र्यांसमोर ठेवली. या महामार्गाचे झालेले काम हे काहीठिकाणी निकृष्ट झालेले असल्याने खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावरून गाडी चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ठेकेदार कंपनी निधी नसल्याचे कारण देत काम रखडवत आहे. शिवाय काम करताना ठेकेदार कंपनी पुरेशी काळजी न घेता काम करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत असल्याची तक्रार केली.
दरम्यान, या महामार्गाच्या कामाबाबतचा अहवाल तयार करून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासमवेत खासदारासह बैठक घेवून हे काम येत्या वर्षभरात पूर्णत्वास जाईल याकडे जातीने लक्ष घालीन असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच गणेशोत्सवापूर्वी खड्डेमय रस्ता दुरूस्ती करण्याच्या सूचना संबंधितांना देवून रोजच्या कामांचा अहवाल सादर करण्यात यावा असे आदेशही त्यांनी महामार्ग विभागाला दिले.
परशुराम घाट तत्काळ सुरू करा– शेखर निकम
परशुराम घाट पूर्णपणे तत्काळ सुरू करावा, महामार्गावरील खड्डे भरणे, मार्लेश्वर देवस्थानकडे जाणारा रस्ता व्हावा या मागण्यांसह अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या मात्र शासनाने स्थगिती दिलेल्या रस्त्यांवरील स्थगिती उठवावी आदी मागण्या आमदार शेखर निकम यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली. परशुराम देवस्थान येथील पेढे-परशुराम गावाला जोडणारा ओव्हरब्रिज, गावच्या पालख्या जाणाऱया रस्त्यावरील फूटब्रिज, तसेच महामार्गला जोडणाऱया पाखाडय़ांना मंजुरी देण्यात यावी, तसेच महामार्गाचे काम करताना ठेकेदाराने अनधिकृतपणे बोअर ब्लास्टींग करून काम केल्यामुळेच काही घरांना तडे जावून ती मोडकळीस आलेली आहेत अशा घरांचे पुन्हा सर्वेक्षण करून त्यांना ठेकेदाराकडून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना देवून भरपाई रक्कम देण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन निकम यांनी दिले आहे.
अणुस्कुरा रस्ता डागडुजीसाठीही निधी
या बैठकीत ओणी-अणुस्कुरा रस्त्याच्या डागडुजीसाठीही निधी उपलब्ध करून देण्याचे बांधकाम मंत्र्यांनी मान्य केले आहे. बांधकाम मंत्री स्वतः लवकरच मुंबई – गोवा महामार्ग पाहणी दौरा करणार असल्याचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.









