वृत्तसंस्था/ रॉटरडॅम
पाकिस्तानने यजमान हॉलंडचा (नेदरलँड्सचा) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील रविवारी झालेल्या तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात पाकने नेदरलँड्सचा 9 धावांनी पराभव केला. या सामन्यात पाकच्या नसीम शहाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने 33 धावात 5 गडी बाद केले.
या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकचा डाव 49.4 षटकात 206 धावात आटोपला. त्यानंतर नेदरलँडचा डाव 49.2 षटकात 197 धावात गुंडाळून पाकने ही मालिका एकतर्फी जिंकली.
पाकच्या डावामध्ये कर्णधार बाबर आझमने 125 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह कप्तानी खेळी करताना 91 धावा झळकविल्या. कर्णधार आझम वगळता पाकच्या इतर फलंदाजांना 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. फख्र झमानने 43 चेंडूत 4 चौकारांसह 26, सलमानने 42 चेंडूत 1 चौकारासह 24, मोहम्मद नवाजने 35 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 27, मोहम्मद वासीमने 1 षटकारासह 11 धावा जमविल्या. पाकच्या डावामध्ये 6 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी पाकच्या फलंदाजांना फटकेबाजीपासून शेवटपर्यंत रोखले. नेदरलँड्सतर्फे डिलेडीने 50 धावात 3 तर किंगमाने 15 धावात 2, आर्यन दत्त, एस. अहमद आणि व्हॅनबेक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या भेदक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणासमोर हॉलंडला 49.2 षटकात 197 धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीचा फलंदाज विक्रमजित सिंगने 85 चेंडूत 7 चौकारांसह 50, मुसा अहमदने 11, टॉम कूपरने 105 चेंडूत 4 चौकारांसह 62, निडामेनेरूने 32 चेंडूत 2 चौकारांसह 24 धावा जमविल्या. नेदरलँड्सच्या डावात 15 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे नसीम शहा सर्वात यशस्वी आणि प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 33 धावात 5 तर मोहम्मद वासीमने 36 धावात 4 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः पाक 49.4 षटकात सर्वबाद 206 (बाबर आझम 91, मोहम्मद नवाज 27, फख्र झमान 26, सलमान 24, मोहम्मद वासीम 11, डिलेडी 3-50, किंगमा 2-15, आर्यन दत्त, एस. अहमद, व्हॅनबेक प्रत्येकी 1 बळी), नेदरलँड्स 49.2 षटकात सर्वबाद 197 (विक्रमजित सिंग 50, मुसा अहमद 11, टॉम कूपर 62, निडामेनेरू 24, नसीम शहा 5-33, मोहम्मद वासीम 4-36).









