अध्याय विसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, संसारसमुद्रामध्ये नरदेह हेच तारू आहे आणि सद्गुरु त्याचा कर्णधार आहे. पैलथडी पोचवावयाला मी श्रीहरि हा अनुकूल वाहणारा वायु आहे. भोवरे, धबधबे, खळाळाचे पाणी, हेलकावे, विकल्पाचे कल्लोळ व पाण्याचे एकामागून एक येत असलेले लोंढे या सर्वांस चुकवून सद्गुरू आपली नौका झपाटय़ाने पुढे काढतात. विवेकाची वल्ही लावून कर्माकर्माचे पाणी तोडले जाते व भजनरूप शिडाच्या बळावर नौका मोठय़ा वेगाने चालत असते. कामक्रोधादि थोर थोर मासे आमिष मिळविण्याकरितां टपून बसलेले असतात. त्यावर शांतीचे जाळे टाकून सद्गुरू आपले तारू मोठय़ा शिताफीने चालवीत असतात. वाटेत सारूप्यादि मुक्तींची बंदरे लागतात, तेव्हा त्या तारवामध्ये अनुहत वाद्यांच्या तुताऱया जयजयकाराने गर्जू लागतात. सलोकतेच्या पेठेला तारू नेले तर ते कदाचित् उलथून पडेल किंवा समीपतेच्या मार्गाला लावले तर ते दोन्ही बाजूला कलंडू लागेल. ह्याकरिता सरूपतेमध्ये तारू स्थिर करावे, तर तिकडे दाटी फार असते, हे सर्व लक्षात आणून तारू सायुज्यबंदरात ढकलतात.
तेथे धार्मिक लोकांची निर्मळधर्मपेठच असते. तिच्यात सुखसारा व खटपट नाही. वस्तु सगळीच निर्मळ असल्याने पाहिजे तो माल एकदम द्यावा घ्यावा. असे हे दुर्लभ नरदेहाचे तारू असून त्यात श्रीगुरुरूपाने मीच कर्णधार म्हणजे नावाडी आहे. या तारवाच्या साहाय्याने जो कोणी संसार तरून जाणार नाही, तो पुरुष आत्मघातकी समजला पाहिजे. पुढे कोटिकल्प नरकयातना भोगण्यासाठीच विषयामध्ये हा नरदेह खर्च केला, तर आपल्या हातानेच आपल्या उरात शस्त्र खुपसून घेण्यासारखे आहे. नौका फोडून जाळून त्यावर चणे फुटाणे भाजून खावेत, किंवा शहाण्यांनी थंडीच्या भयाने पांघरुणे जाळून तापत बसावे तसेच खरोखर येथे होते. फुकटच्या नरदेहालाच लोक मुकतात. त्यामुळे पुढे दुःखाचे दुर्धर डोंगर येऊन पडतात! खरोखर साऱया योनीमध्ये विषयासक्ती ही सर्वांनाच लागलेली आहे. नरदेहातही विषयसंबंधाने तशीच स्थिती राहिली, तर त्याच्या तोंडात माती पडलीच म्हणून समजावे. श्रे÷ नरशरीर प्राप्त झाले असूनही जो संसाराच्या पैलथडीला जाणार नाही, तो उद्धवा! खरोखर आत्महत्याच करणारा पुरुष होय. कोटय़वधी ब्रह्महत्या किंवा गोहत्या केल्या तरी त्याला शास्त्रार्थाने प्रायश्चित्त आहे पण जो आत्महत्याच करून घेतो, त्याला काही प्रायश्चित्त असत नाही कारण, जो आत्महत्या करून मरण पावतो, तो मरताच नरकाला जातो. मग प्रायश्चित्त घ्यावयाला उरले कोण? आणि शास्त्रार्थ तरी सांगावयाचा कोणाला? अमृत विकून टाकून पेज प्यावी, त्याप्रमाणे नरदेहात येऊन विषयभोगच भोगले, तर जीवाचा खरा स्वार्थ बुडून तो अधिक नाडला मात्र जातो. उत्तम शरीर प्राप्त होऊन विषयासक्तीमुळे असंख्य लोक बुडतात, पण ह्या मूर्खांच्या गोष्टी राहू द्यात. आता वेदार्थाला अनुसरून आपल्या हितावर दृष्टि ठेवून सावध असणाऱया उत्तम लोकांची पद्धत ऐक. जे स्वभावानेच अत्यंत विरक्त असतात, त्यांनी कोणते कर्तव्य करावे? कोणती गोष्ट टाकून द्यावी हे तुला सांगतो. कर्मामध्ये दोष पाहून त्यांना त्याचा उबग आलेला असतो. त्यांनी इंद्रियांवर ताबा मिळवून अभ्यासाने आपले मन स्थिर करावे. जो कर्मारंभीच विरक्त असतो, फलाच्या आशेला ज्याचे चित्त शिवतही नाही ‘मला मोक्ष मिळावा’ असेही ज्याच्या अंतःकरणाला आठवत नाही, वैराग्याची दृष्टि खडतर असल्याने तो इंद्रियांना विषयाची गोष्टसुद्धा काढू देत नाही. असा कडकडीत मनोनिग्रही स्वरूपाची धारणा नेटाने दृढ राखतो. श्रवण व मनन करून माझ्या स्वरूपाचे नेहमी अनुसंधान ठेवतो. अखंड माझाच निदिध्यास करीत राहातो. मन तिळभरसुद्धा ढळू देत नाही. धारणेच्या बळाने आत्मस्वरूपामध्येच मन स्थिर ठेवतो, यत्किंचितही ढळू देत नाही. निजबोधाने ते निश्चळ राखतो.
क्रमशः







