ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राऊतांचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे.
गोरेगावमधील 1034 कोटींच्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणात राऊत यांना 31 ऑगस्टला ईडीने अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. आज कोठडी संपल्यामुळे त्यांना विशेष ईडी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या कोठडीमध्ये 5 सप्टेंबरपर्यंत वाढ केली.
काय होतं प्रकरण?
गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. त्यामुळे या चाळीत राहणाऱ्या लोकांची फसवणूक झाली. प्रवीण राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर एकूण 7 ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात.
याप्रकरणाच्या तपासादरम्यान असं आढळून आलं होतं की, प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांच्या बँक खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यात 83 लाख रुपये पाठवण्यात आले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. याप्रकरणी वर्षा आणि माधुरी राऊत यांचेही जबाब नोंदवण्यात आले होते.