विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याची मागणी
वार्ताहर /केरी
सत्तरीतील रावण येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाकडे जाण्यासाठी रस्त्याची सोय करावी, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. यासंबंधीचे मागणी करणारे पत्र त्यांनी नुकतेच वाळपई मामलेदार कार्यालयाला दिले आहे.
मधलावाडा रावण येथे सरकारी प्राथमिक विद्यालय आहे. हे विद्यालाय रावणाच्या मुख्य रस्त्यापासून सुमारे 500 मीटर अंतरावर आहे. पण या विद्यालयाकडे जाण्यासाठी रस्त्याची अथवा पायवाटेच्या सोय नाही. सध्या येथे जाणारी पायवाट एका खाजगी मालकीच्या जमिनीतून जाते. अशा पायवाटेऐवजी मुख्य रस्त्यावरून या शाळेपर्यंत पक्क्या रस्त्याची वाट करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. यासंबंधी मागणी करणारे पत्र ग्रामस्थांनी वाळपई मामलेदार कार्यालयाला दिले असून त्यावर 86 ग्रामस्थांच्या सहय़ा आहेत.
यासंबंधी पालक शिक्षक संघाच्या अध्यक्ष भागीरथी कु÷ा मयेकर म्हणाल्या, मुख्य रस्ता ते विद्यालयापर्यंत पक्का रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. शाळेत काही वस्तू आणायची असल्यास रस्त्याअभावी मोठी गैरसोय होते. सरकारने ही गैरसोय दूर करावी.
प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गैरसोय
येथील सरकारी प्राथमिक विद्यालायत एकूण 29 विद्यार्थी शिक्षण घेत असतात. पण या विद्यालयात जाण्यासाठी व्यवस्थित पायवाट अथवा पक्का रस्ता नसल्याने मुलांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच या विद्यालयाच्या आवारात महिला आणि बाल कल्याण खात्यांअतर्गत चालणारी अंगणवाडी आहे. या अंगणवाडीचे बांधकाम सध्या सुरू आहे. लगेच या नवीन इमारतीत अंगणवाडी हलवली जाईल. तेव्हा अंगणवाडी विद्यार्थ्यांना यांची गैरसोय होणार आहे.









