शहर परिसरात खरेदीवर परिणाम : हेस्कॉम कर्मचाऱयांकडून दुरुस्तीचे काम
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर आला असल्याने प्रत्येकजण गणरायाच्या आगमनाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे खरेदीसाठी सर्वत्र गर्दी होत असताना रविवारी हेस्कॉमच्या ब्लॅक संडेमुळे याचा परिणाम खरेदीवर जाणवला. विद्युत पुरवठा नसल्याने जनरेटर, इन्व्हर्टरच्या साहाय्याने साहित्याची विक्री करावी लागली. तसेच शहरातील अनेक भागांमध्ये हेस्कॉम कर्मचाऱयांकडून दुरुस्तीचे काम सुरू होते.
हेस्कॉमकडून रविवारी शहराच्या अधिकतर भागात सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. तर काही भागात सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीज नव्हती. रविवारी साप्ताहिक सुटी असल्यामुळे नोकरदार वर्ग खरेदीसाठी बाहेर पडत होते. गणेशोत्सवाची खरेदी करण्यासाठी बेळगाव, शहापूर, वडगाव, टिळकवाडी या परिसरात गर्दी झाली होती. पुढील रविवारी खरेदीसाठी गर्दी होणार असल्याने त्यापूर्वीच खरेदी करण्यासाठी नागरिक बाहेर पडल्याचे दिसून आले.
रविवारी सकाळी 9 वा. टिळकवाडी, उद्यमबाग, वडगाव, शहापूर, अनगोळ, रेल्वेस्टेशन, शिवबसवनगर, महांतेशनगर, अशोकनगर, शिवाजीनगर, डीसी कंपाऊंड, बेळगाव शहर या परिसरात वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. याचबरोबर ग्रामीण भागातील काही गावांमध्येदेखील वीजपुरवठा ठप्प होता. वीजपुरवठा बंद असल्याने नाराजीचा सूर उमटत होता.
दुरुस्तीची मोहीम
गणेशोत्सव काळात नागरिक व मंडळांना विजेच्या समस्या जाणवू नये यासाठी रविवारी दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात आली होती. ट्रान्स्फॉर्मरची तपासणी, विद्युतवाहिन्यांना लागणाऱया फांद्या तोडणे यासह इतर कामे करण्यात आले.
विनोद करूर (साहाय्यक कार्यकारी अभियंता, हेस्कॉम)
बाजारपेठेत जनरेटरची घरघर
शहराच्या अधिकतर भागात वीज नसल्यामुळे सर्वत्र जनरेटरची घरघर सुरू होती. वीज नसल्यामुळे डिझेल व पेट्रोलचा खर्च करत जनरेटर सुरू करण्याची वेळ व्यापारी वर्गावर आली. दुपारनंतर काही भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. तर काही भागात रात्री उशिरापर्यंत हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम सुरू होते.









