ओडिशात 26 मुलांमध्ये संक्रमण ः देशात आतापर्यंत 100 हून अधिक रुग्ण
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
भारतात एका नव्या आजाराचा फैलाव होत आहे. सर्वसाधारपणे याला टोमॅटो फ्ल्यू म्हटले जात आहे. या आजारात रुग्णाच्या शरीरावर लाल चट्टे दिसू लागतात आणि हळूहळू ते टॉमेटोच्या आकारापर्यंत मोठे होत असतात. या आजारावरून लॅन्सेटर रेस्पिरेटरी जर्नलने एक अहवाल जारी केला आहे. टोमॅटो फ्ल्यूचे संक्रमण 1-5 वयोगटातील मुलांमध्ये दिसून आले आहे. हात, पाय आणि तोंडात याचा प्रभाव दिसून येतो.

दोन महिन्यांपूर्वी केरळमध्ये याचे रुग्ण आढळून आले होते. केरळनंतर ओडिशातही याचे रुग्ण सापडले आहेत. लॅन्सेट रेस्पिरेटरी जर्नलनुसार भुवनेश्वरमध्ये 26 मुले संक्रमित आढळून आली आहेत. 20 ऑगस्टपर्यंत केरळ, तामिळनाडू आणि ओडिशात हा विषाणू फैलावल्याचे वृत्त आहे. देशात टोमॅटो फ्ल्यूचे 100 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. एकटय़ा केरळमध्येच 82 रुग्णांची नोंद झाली आहे. डॉक्टरांनी देशभरात या आजारावरून सतर्कचा इशारा दिला आहे. हा इशारा विशेषकरून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूतील लोकांसाठी आहे.
हा आजार एकप्रकारचा व्हायरल फ्ल्यू असून तो बहुतांशी मुलांमध्येच दिसून येतो. या आजाराने ग्रस्त मुलांच्या शरीरात टॉमेटोच्या आकारासारखे फोड तयार होऊ लागतात. त्वचेचा दाह सुरू होतो. तोंड कोरडे पडू लागते आणि तहान देखील लागत नसल्याचे लॅन्सेटच्या अहवालात म्हटले गेले आहे.
मुलांच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ लागल्याने हा आजार अधिकच गंभीर ठरू शकतो. याचबरोबर तीव्र ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डिहायड्रेशन होऊ लागते. हात, गुडघे आणि पार्श्वभागाचा रंग फिका पडणे देखील या आजाराचे लक्षण मानले जत आहे.









