जवाहिरीच्या घराजवळ करत होता चित्रिकरण
वृत्तसंस्था/ काबूल
अमेरिकन चित्रपट निर्माता आणि अफगाणी निर्मात्याला तालिबानने ताब्यात घेतले आहे. अमेरिकन चित्रपट निर्माता आयवर शीयरर आणि अफगाण निर्माता फैजुल्लाह फैजबख्श यांना तालिबाने बळजबरीने ताब्यात घेतल्याचे एका आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमाने सांगितले आहे. शीयरर आणि फैजब्खश हे राजधानी काबूलमधील जिल्हा 10 च्या शेरपूर भागात चित्रिकरण करत होते. याच ठिकाणी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी मारला गेला होता. तालिबानने या दोघांनाही गुप्त ठिकाणी ठेवले आहे.
काही तालिबानी सुरक्षारक्षकांनी त्यांना चित्रिकरणापासून रोखले होते. या दोघांनाही अमेरिकेचे हेर ठरवत तालिबानने अनेक प्रश्न विचारले होते. शीयरर हे फेब्रुवारी महिन्यात एक महिन्याच्या व्हिसावर अफगाणिस्तानात दाखल झाले होते. चित्रिकरणासाठी तालिबानने त्यांना वर्क परमिट दिला होता. मार्च महिन्यात त्यांचा वर्क परमिट एक वर्षासाठी करण्यात आला होता.









