1 लाख पाणीपुऱया वाटणारा पिता
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधील एका व्यक्तीने स्वतःच्या मुलीचा पहिला वाढदिवस आगळय़ावेगळय़ा प्रकारचे साजरा केला आहे. ही व्यक्ती पाणीपुरी विक्रेता असून त्याने शहरातील नागरिकांना 1 लाख 1 हजार पाणीपुरी मोफत खाऊ घालून स्वतःच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला तसेच ‘बेटी बचाओ’चा संदेश समाजाला दिला आहे.
भोपाळच्या कोलार भागात गुप्ता पाणीपुरी भांडार या नावाने पाणीपुरी विकणाऱया आंचल गुप्ता यांनी देखील स्वतःच्या मुलीच्या वाढदिवशी लोकांना 50 हजार पाणीपुऱया मोफत खाऊ घातल्या.मुलीच्या पहिल्या वाढदिवसानंतर गुप्ता यांनी लोकांना ‘बेटी है तो कल है’ असा संदेश दिला आणि दिवसभरात एक लाख पाणीपुरी लोकांना मोफत खाऊ घातली आहे. त्याकरता त्यांनी परिसरातील एका मैदानात 50 मीटर लांबीच्या तंबूत 21 स्टॉल्स लावले होते आणि रोजंदारीवर असलेल्या 25 मुलांना पाणीपुरीचे वाटप करायला लावले.

या ठिकाणी ‘बेटी वरदान है’, ‘बेटी बचाओ’, ‘बेटी पढाओ’चे बॅनर लावण्यात आले होते. तीन वर्षांचा मुलगा आणि एक वर्षीय मुलीचे वडिल असलेल्या गुप्ता यांनी पाणीपुरीची गाडी चालवून महिन्याकाठी 15 ते 20 हजार कमाई होत असल्याचे सांगितले आहे.
मुलीचा जन्म माझ्यासाठी स्वप्नपूर्ती सारखा आहे. मला नेहमीच मुलगी हवी होती. मागील वर्षी 17 ऑगस्ट रोजी देवाने आशीर्वाद म्हणून मुलगी दिली. मुलगी ही घराची लक्ष्मी असते, तिच्यामुळेच घरात समृद्धी येते. यामुळे समाजातील लोकांची मानसिकता आता पूर्णपणे बदलली पाहिजे. मुलींना कुणीच भार समजू नये असे गुप्ता यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करून गुप्ता यांच्या मुलीला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सदैव सुखी आणि आनंदी रहा’ असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. अनेकांनी माझ्या मुलीला भेटवस्तूही दिल्या आहेत अशी माहिती गुप्ता यांनी दिली. या कार्यक्रमाला स्थानिक आमदार रामेश्वर शर्मा यांनीही हजेरी लावत गुप्ता दांपत्याने आयोजित केलेल्या अनोख्या सोहळय़ाचे कौतुक केले.









