सांबरा/ वार्ताहर
बसवन कुडची येथे शनिवारी सकाळी शिवारामध्ये एका शेतकऱयाला दिसलेला बिबटय़ासदृश प्राणी हा तरस असल्याचे अखेर सिद्ध झाले आहे. त्यामुळे शेतकऱयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तसेच पूर्वभागामध्ये बिबटय़ा आल्याच्या अफवेला पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
बसवन कुडची येथील शेतकरी शनिवारी सकाळी गावाच्या उत्तरेकडे असलेल्या बळळारी नाल्याजवळील शेतामध्ये गवत आणण्यासाठी गेले होते. गवत घेऊन येताना तानाजी मुतगेकर यांनी आपल्या दिशेने एक बिबटय़ासदृश प्राणी येत असल्याचे पाहून एकच आरडाओरड केली. यावेळी बाजूलाच गवत कापत असलेले प्रकाश मुतगेकर व रघुनाथ बेडका हे त्याठिकाणी धावून आले. त्यानंतर त्या प्राण्याने उसाच्या फडात पळ काढला. यानंतर लागलीच तानाजी मुतगेकर हे घाबरून गावाकडे पळत सुटले व त्यांनी ही माहिती गावामध्ये सांगितली. त्यानंतर पूर्वभागामध्ये बिबटय़ा आल्याची एकच अफवा वाऱयासारखी पसरली व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर तानाजी मुतगेकर यांना मोबाईलवर बिबटय़ा व तरस या प्राण्यांची चित्रे दाखविण्यात आली. यावेळी त्यांनी सदर प्राणी हा तरस असल्याचे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र तोपर्यंत पूर्वभागामध्ये बिबटय़ा आल्याची अफवा जोरदार पसरली होती. त्यामुळे नजीकच्या निलजी, मुतगा व सांबरा ग्रामपंचायतींनी गावात दवंडी पिटवून बिबटय़ा आल्याचे सांगून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते.
पंधरा दिवसांपूर्वी सर्वप्रथम मोदगा गावामध्ये तरस दिसला होता. त्यानंतर पंतबाळेकुंद्री व बाळेकुंद्री खुर्दच्या शिवारामध्ये गेल्या आठ दिवसांपासून तळ ठोकून होता. हाच तरस कुडचीच्या शिवारात भटकत गेला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तरस हा मांसाहारी व स्तनधारी प्राणी असून तो साधारण कुत्र्याप्रमाणे दिसतो. तो दिसायला भयानक असतो. तरस हा मयत प्राण्यांचे मांस खाऊन जगतो तर ते दुसऱयाने केलेली शिकार पळविण्यासाठी तरबेज असतात. ते टोळक्मयामध्ये असल्यास माणसावर हल्लाही करू शकतात. तरस एक आहे की आणखी काही आहेत, याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही.









