वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उझ्बेकिस्तान येथून गोकुळम केरळ महिला फुटबॉल संघ मायदेशी परतणार आहे. फिफाने अलीकडेच भारतीय फुटबॉल फेडरेशनवर बंदी घातली असल्याने एएफसी महिलांच्या क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेतून भारतीय संघाला बाहेर काढण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर संघाला मायदेशी परतावे लागत आहे.
आशालता देवीच्या नेतृत्वाखाली 23 जणींचा भारतीय महिला फुटबॉल संघ एएफसी महिलांच्या क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेत भाग घेणार होता. सदर स्पर्धा उझ्बेकची राजधानी ताश्कंद येथे खेळविली जाणार होती. दरम्यान ताश्कंदमध्ये भारतीय महिला फुटबॉल संघ चार दिवस ताटकळत राहिला.
गोकुळम महिला केरळ फुटबॉल संघ हा इंडियन वूमन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील विजेता आहे. एएफसी महिलांच्या क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेत गोकुळम केरळचा 23 ऑगस्टला सामना कुरेशी येथे सोगदिना संघाविरुद्ध खेळविला जाणार होता. त्यानंतर 26 ऑगस्टला त्यांचा दुसरा सामना इराणच्या बेम खेतून एफसी संघाविरुद्ध आयोजित केला होता पण आता गोकुळम केरळ महिला फुटबॉल संघ एएफसी महिलांच्या क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेत खेळणार नाही. एएफसीने गोकुळम केरळ संघाचे या स्पर्धेतील सर्व सामने रद्द केले आहेत.