वृत्तसंस्था/ सोफिया (बल्गेरिया)
येथे सुरू असलेल्या 2022 कनिष्ठ गट महिला विश्व कुस्ती स्पर्धेत भारतीय संघाने उपविजेतेपद पटकाविले. भारतीय संघातील अंतिमने महिलांच्या 53 किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवून या स्पर्धेत नवा इतिहास घडविला.
या आंतरराष्ट्रीय महिलांच्या विश्व कुस्ती स्पर्धेत जपानने एकूण 230 गुणासह सांघिक गटात विजेतेपद पटकाविले असून भारताने 160 गुणासह उपविजेतेपद तसेच अमेरिकेने 124 गुणासह तिसरे स्थान मिळविले. महिलांच्या 53 किलो वजन गटात अंतिमने कजाकस्तानच्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करून सुवर्णपदक हस्तगत केले. पात्र फेरीमध्ये अंतिमने जर्मनीच्या मल्लाला 11-0 असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अंतिमने जपानच्या मल्लावर विजय मिळविला. उपांत्य लढतीत तिने युक्रेनच्या मल्लाचे आव्हान संपुष्टात अंतिम फेरीत स्थान मिळविले. अंतिम लढतीत अंतिमने कजाकस्तानच्या मल्लाचा पराभव केला. या स्पर्धेत भारताच्या सोनम आणि प्रियांका यांनी अनुक्रमे 62 आणि 65 किलो वजन गटात रौप्यपदके, सिटो आणि रितीका यांनी अनुक्रमे 57 आणि 72 किलो वजन गटात कास्यपदके मिळविली. ग्रिको रोमन पद्धतीमध्ये भारताच्या पाचही मल्लांना पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. अलीकडेच झालेल्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय मल्लांची कामगिरी दर्जेदार झाली. या स्पर्धेत भारतीय मल्लांनी 6 सुवर्णासह एकूण 12 पदकांची कमाई केली. भारताने या स्पर्धेत एकूण 61 पदके मिळविली होती.









