वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
थायलंडमधील पटाया येथे सुरू असलेल्या थायलंड पॅरा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि सुकांत कदम यांनी पुरुष दुहेरीत सुवर्णपदक पटकाविताना इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव केला.
भगत आणि कदम यांनी शनिवारी झालेल्या पुरुष दुहेरीच्या एसएल 3- एसएल 4 प्रकारातील सामन्यात इंडोनेशियन जोडी द्वियोको आणि सेटिवान यांचा 21-18, 21-13 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धेत पुरुष एकेरीत प्रमोद भगत आणि सुकांत कदम यांना प्रत्येकी एक रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मिश्र दुहेरीच्या एसएल3-एसयू 5 या विभागात भारताच्या ऋतिक रघुपती आणि मानसी जोशी यांना रौप्यपदक मिळाले.
महिलांच्या एकेरीत एसएल 3 गटात भारताच्या मनदीप कौरने आपल्याच देशाच्या मानसी जोशीचा 20-22, 21-19, 21-14 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. महिलांच्या एसयू5 विभागात भारताच्या मनीषा रामदासने जपानच्या केमियामाचा 20-22, 21-12, 21-19 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. महिलांच्या एसएल3-एसयू5 दुहेरीत भारताच्या मानसी आणि शांतिया विश्वनाथन यांनी रौप्यपदक घेतले.









