वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय महिला क्रिकेट संघातील अनुभवी आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू, वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघ सप्टेंबर महिन्यात इंग्लंडच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात उभय संघात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. या दौऱयातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 24 सप्टेंबरला लॉर्डस् मैदानावर होणार आहे. झुलन गोस्वामीचा हा समारोपाचा सामना असेल, असे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले.
भारतीय महिला क्रिकेट संघातील अनुभवी, वेगवान गोलंदाज 39 वर्षीय झुलन गोस्वामीने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 12 कसोटी, 68 टी-20 सामने आणि 201 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले. तिने कसोटीत 44, टी-20 प्रकारात 56 तर वनडे प्रकारात 252 गडी बाद केले आहेत. 2022 साली झालेल्या आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झुलन गोस्वामीने या स्पर्धेच्या इतिहासामध्ये 39 गडी बाद करून सर्वाधिक बळी मिळविणाऱया विक्रमाशी बरोबरी केली होती. 2005 साली तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले असून 2005, 2009, 2013, 2017 आणि 2022 अशा आयसीसीच्या पाच विश्वचषक महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.









