-राजर्षी शाहू स्मारकमध्ये मंगळवारपासून प्रारंभ : कै. जयंत सहस्त्रबुद्धे यांचा स्वातंत्र्यलढय़ातील सचित्र ऐतिहासिक, दुर्मीळ ठेवा : विद्यार्थी, विद्यार्थिंनीसह सर्वांनी भेट देण्याचे आवाहन
प्रतिनिधी/कोल्हापूर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीच्या वतीने अकोल्याच्या (कै.) जयंत सहस्त्रबुध्दे यांनी साकारलेल्या ‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये 23 ते 26 ऑगस्ट दरम्यान हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 7 यावेळेत पाहण्याची संधी अबालवृद्धांना लाभणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी (23 ऑगस्ट) दुपारी चार वाजता होणार आहे.
अकोल्यातील रहिवासी (कै.) जयंत सहस्त्रबुध्दे यांनी ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीविरूध्द लढा दिलेल्या स्वातंत्रसेनानींची सचित्र माहिती जमा केली आहे. यामध्ये अत्यंत दुर्मीळ अशी चित्रे, छायाचित्रे आहेत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी हजारो लाखो ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी, स्वातंत्र्यसेनानींनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, घरादारावर तुळसीपत्र ठेवून त्याग केला. त्यांची माहिती चित्र आणि शब्दरूपात एकत्रित करण्याचे कार्य सहस्त्रबुद्धे यांनी केले. ते नव्या पिढीला पाहता यावे यासाठी त्याचे प्रदर्शन सुरू केले.
लोकमान्य को-ऑप मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी नव्या पिढीपर्यंत स्वातंत्र्यसेनानींची, स्वातंत्र्यसैनिकांची माहिती पोहचावी, या उदात्त हेतुने ‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ प्रदर्शन जास्तीत जास्त ठिकाणी भरवण्याचा मानस केला आहे. लोकमान्यतर्फे आजपर्यंत राज्यात विविध ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. आता दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे 23 ते 26 ऑगस्ट दरम्यान हे प्रदर्शन पाहण्याची कोल्हापूरकारांना मिळणार आहे. प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे. प्रदर्शनाला सर्व नागरिकांसह शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिंनी, पालक आणि लोकमान्यचे ग्राहक, सभासद, हितचिंतक यांनी भेट देवून स्वातंत्र्यसैनिकांविषयीची माहिती घ्यावी, असे आवाहन लोकमान्य को-ऑप मल्टीपर्पज सोसायटीचे क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप पाटील-वाकरेकर यांनी केले आहे.
शाळा, कॉलेजना आवाहन
कोल्हापूर शहरासह जिल्हय़ातील विविध शाळा, महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, जास्तीत जास्त विद्यार्थी प्रदर्शनस्थळी उपस्थित ठेवून या प्रदर्शनाचा लाभ सर्वांना मिळवून द्यावा, असे आवाहन ‘लोकमान्य’ च्या वतीने करण्यात आले आहे.









