तरुणभारत ऑनलाइन
दुधी भोपळा औषधी भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे असतात.पण दुधी भोपळ्याची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. आणि आणि लहान मुलेही दुधीची भाजी खाण्यास टाळाटाळ करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला खमंग ,पौष्टिक आणि चविष्ट असे दुधीभोपळ्याच्या थालीपीठाची रेसिपी सांगणार आहोत,जी बनवायला सोपी देखील आहे आणि झटपट देखील बनते.आणि हे थालीपीठ मुलांना देखील नक्की आवडेल.
थालीपिठासाठी लागणारे साहित्य
दुधीभोपळयाचा किस
लाल तिखट
हळद
जीरे पावडर
धने पावडर
तीळ
थोडी कोथिंबीर
बेसन पीठ
तांदळाचे पीठ
थोडेसे पाणी व तेल
चवीप्रमाणे मीठ
कृती :
सर्वप्रथम एका ताटामध्ये दुधीभोपळयाचा किस घ्या. त्यामध्ये गरजेनुसार हळद ,मीठ ,थोडेसे तीळ, धने-जिरे पावडर ,बारीक चिरलेली कोथंबीर आणि लाल तिखट हे सर्व पदार्थ मिक्स करून घ्या. जर तुम्हाला थालीपीठ तिखट हवे असेल तर त्यात तुम्ही हिरव्या मिरचची पेस्टही घालू शकता. यानंतर या मिश्रणात बेसन पीठ आणि थोडेसे तांदळाचे पीठ घाला. तांदळाच्या पिठामुळे थालीपीठ कुरकुरीत होते. मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून पीठ सैलसर तयार करावे जेणेकरून ते आपल्याला थापता येईल. नंतर गॅस वर तवा ठेवावा व थोडे तेल पूर्ण तव्यावर पसरावे नंतर पाणी हाताला लावून थालीपीठ मिश्रणाचा गोळा घेऊन तो तव्यावर थापावा दोन्ही बाजूने ते लालसर होईपर्यंत भाजावे,जर तव्यावर थालीपीठ थापता येत नसेल तर रुमाल ओला करून त्यावर थालीपीठ मिश्रणाचा गोळा घेऊन तो थापून मग तव्यावर टाकावे आणि अलगद रुमाल दोन्ही हातांनी काढून घ्यावा. दोन्ही बाजुंनी थालीपीठ भाजून घेतल्यानंतर दही ,रायता किंवा लोणच्यासोबाबत हे सर्व्ह करावे.