जाहिरात फलक हटविण्याची जिल्हा प्रशासनाकडून कॅन्टोन्मेंटला सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
खानापूर रोडवर कॅम्प परिसरात झालेल्या अपघातात शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे खबरदारीच्या उपाय-योजना राबविण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. खानापूर मार्गावर असलेले जाहिरात फलक तसेच फुटपाथवर आडवे लावण्यात आलेले जाहिरातीचे फलक तातडीने हटविण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी बजावला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डला पत्र पाठवून सदर कारवाईची सूचना केली आहे.
कॅम्प परिसरात रस्ता रुंदीकरण झाले नसल्याने काही ठिकाणी अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच काही ठिकाणी मोठमोठे जाहिरात फलक लावण्यात आल्याने धोका निर्माण झाला आहे. ग्लोब थिएटर ते गोगटे चौकपर्यंतच्या रस्त्याशेजारी फुटपाथवर आडवे मोठय़ा आकाराचे जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. तसेच काही व्यापाऱयांनी देखील फुटपाथवर व्यवसाय थाटले आहेत. परिणामी पादचाऱयांना फुटपाथवरून ये-जा करताना अडचण निर्माण होत आहे. काही ठिकाणी फुटपाथ नसल्याने पादचाऱयांची गैरसोय होत आहे.
आदेश बजावूनही कारवाई नाही
कॅम्प परिसरात झालेल्या अपघातानंतर खबरदारीच्या उपाय-योजना राबविण्याची सूचना कॅन्टोन्मेंट प्रशासनाला करण्यात आली आहे. खानापूर रोडशेजारी असलेले फुटपाथवरील जाहिरात फलक तातडीने हटविण्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कॅन्टोन्मेंट बोर्डला करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने पत्र पाठवून तातडीने कारवाई करण्याचा आदेश बजावला आहे. सदर आदेश बजावून आठ दिवस झाले. पण कॅन्टोन्मेंट बोर्डकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. याबाबत कॅन्टोन्मेंटकडे चौकशी केली असता. जाहिरात कंत्राटदाराला फलक हटविण्यासाठी नोटीस बजाविली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे फुटपाथवरील जाहिरात फलक कधी हटणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.









