तब्बल चार गाडय़ा अडकल्या
प्रतिनिधी / मडगाव
कुंकळळे-म्हार्दोळ येथे बुधवारी रात्री अज्ञात चोरटय़ांनी चोरीचा धाडसी प्रयत्न केला. या चोरटय़ांनी चोरी करण्यासाठी आणलेल्या दुचाकी रस्त्यात अडकून पडल्या तसेच चोरटय़ांनी सायकल घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. ती सायकल देखील अडकून पडली. चोरटे पळून गेले खरे, परंतु त्यांची सहीसलामत सुटका झाली नसल्याचे या घटणेतून सिद्ध झाले आहे.
कुंकळळे येथील घोडकिरेवाडय़ावर आजही पवित्र्य जपले जाते. येथील ‘राखणदार’ अर्थात ‘देवचार’ जागृत आहे. त्यांनेच चोरटय़ांच्या दुचाकी रोखून धरल्याची भावना आत्ता गावात निर्माण झाली आहे. वैद्यकीय क्षेत्राचा अभ्यास केलेले स्थानिक रहिवासी डॉ. मधु घोडकिरेकर यांनी ही आपल्या फेसबुक पोस्टद्वारे पुष्टी दिली आहे.
आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये डॉ. मधु घोडकिरेकर म्हणतात, घोडकिरेवाडय़ावरील पवित्र्याविषयी पुष्कळ वेळा मी लिहिले आहे. इथले ओवळे सोवळे आदिवासी पंरपरेनुसार एकदम कडक. उदाहरणार्थ येथे कुकुट पालन वर्ज्य. येथल्या राखणदारावार सर्वांचा विश्वास. अशी एक आख्यायीका सांगितली जाते की, एके काळी आपली दहशत माजवत सत्तरीतले राणे या वाडय़ाच्या शिमेवर पोहोचले. नेमके त्यांचे डोळे फुटले आणी सगळा गावभर परतीची वाट शोधू लागले. तीच गत पोर्तुगीजाची झाली, म्हणून या गावात एकही ख्रिश्चन घर नाही असे मानतात. याशिवाय आमच्या घरांना शक्मयतो कुलूप लावले जात नाही. अर्थात यावर इतरांनी विश्वास ठेवायचा की नाही हा जाचा त्याचा प्रश्न.
आज शाळेत गोकुळाष्टमी कार्यक्रम असल्यामुळे छोटीने ‘राधे’चा वेश केला होता. पण नेमकी माळायला पांढरी फुले आणायलला विसरलो. त्यामुळे आज रोजच्या पेक्षा दहा मिनिटे लवकर बाहेर पडलो. शंभर मिटरवर पोहचतो तर वरील फोटोतील दुचाकी रस्त्याच्या मध्यभागी उभी, जणू काही माझा रस्ता अडविण्यासाठीच उभी केली आहे. सभोवताली पाहतो तर कुणी नाही. वाटले कुणाची तरी बंद पडली असावी. उशीर नको म्हणून मीच ती बाजूला काढून ठेवली व शाळेत जावून ऑफिस मध्ये गेलो. 10 वाजेपर्यंत मी ही गोष्ट विसरलो. तोपर्यंत एका गावमित्राचा फोन आला व गुरुच्या घरी (हे आमच्याच दहाजण समाजाचे सदस्य पण जवळच्याच वाडय़ावर राहतात) काही चोरटय़ांनी प्रवेश केला व ते त्यांच्या दुकानात अडकले.
गुरुच्या कुटुंबियांनी त्यांना जवळ जवळ पकडलेच होते पण त्यांनी स्वःताची कशीबशी सुटका करून दुचाक्मया व सायकल तेथेच सोडून पायीच पसार झाले. आता मला त्या दुचाकीची आठवण झाली व लगेच घरी फोन करून अजूनही ती दुचाकी मी ठेवली होती तेथे आहे की नाही याची खात्री केली. मी लगेच माझे मित्र पोलीस उपअधीक्षक सी. एल. पाटील साहेबांना माहिती दिली व मी स्वतः तेथे गेलो.
हा फेसबुक पोस्ट लिही पर्यंत तिन्ही दुचाकी मालकांची माहिती मिळाली होती. सगळय़ा दुचाकी चोरीच्या होत्या व त्या मालभाट-मडगाव येथील असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. या दरोडय़ाचा इतर दरोडय़ाशी संबद्ध आहे की नाही हे कळलेले नाही. दुसऱया शब्दात चोरीच्या गाडय़ा घेवून चोरटे घरफोडी करण्यासाठी गावाच्या व आमच्या वाडय़ाच्या आत आले खरे, पण त्याना त्या परत गावा बाहेर परत नेता आल्या नाही. परिणामी सर्व मालकांना आपल्या गाडय़ा परत मिळाल्या. प्रश्न हा आहे की पहाटे त्याच्या गाडय़ा अशा अडविल्या कोणी ? आम्ही असे मानतो की पहाटेच्या वेळी आमच्या राखणदाराची फेरी या वाटेने असते, जेव्हा हा प्रकार घडला तेव्हाही तोच प्रहार होता.
प्रश्न, श्रध्दा-अंधश्रध्दा याहूनही पुढचा आहे. राखणदार आपले काम अजूनही करतो आहे असे आजच्या घटनेवरून तरी दिसते.. असे शास्वत पावित्र्य आम्ही टिकवून ठेवले तर काय वाईट आहे ? असे डॉ. मधु घोडकिरेकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टात म्हटले आहे.