फिरोज मुलाणी / औंध :
जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने बल्गेरिया (सोफिया) येथे सुरू असलेल्या जागतिक ज्युनियर कुस्ती स्पर्धेत 125 किलो वजनगटातून अंतिम फेरीत धडक मारलेला महाराष्ट्राचा तुफानी ताकदीचा नवख्या महेंद्र गायकवाडचे आव्हान इराणचा मासुमीवाला याने मोडून काढले. 13 विरुद्ध 2 गुणांनी ही लढत खिशात घालून सुवर्णपदक मिळवले. प्रतिष्ठेच्या लढतीत महेंद्रला रौप्यपदकावर समाधान मानावे लागेल. मात्र तब्बल 22 वर्षानंतर भारताला खुल्या गटात किताब मिळवून देण्याची कामगिरी महेंद्रने केली आहे.
बुधवारी रात्री भारतीय प्रमाणवेळेनुसार 10 वाजून 21 मिनिटांनी खुल्या गटातील लढतीला प्रारंभ झाला. महेंद्रने निळी तर इराणच्या मल्लाने लाल जर्सी परीधान केली होती. नवख्या महेद्रपेक्षा इराणचा मल्ल अनुभवी आणि तगडा वाटत होता. सलामीलाच त्याने महेंद्रचा एकेरी पट काढून ताबा घेऊन भारंदाज डावावर तब्बल सहा गुणाची कमाई केली. भारंदाज डावावर लढतीचा शेवट होईल, असे वाटत असतानाच महेंद्रने भक्कम बचाव केला. एकतर्फी लढत होत असताना पिछाडीवर असलेल्या महेंद्रने हुकमी हप्ते डावावर दोन गुणांची कमाई करीत आपले गुणाचे खाते उघडले. इराणच्या मल्लाने महेंद्रला पुन्हा निर्णायक रेषेच्या बाहेर ढकलून आणखी एक गुण मिळवला. महेंद्रचा एकेरी पट काढण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. मात्र, इराणच्या मल्लाने दुहेरी पट काढून गुणांची आघाडी 13 वर नेहून ही लढत तांत्रिक गुणाधिक्याने जिंकली.
एशियन चँम्पियनशीप स्पर्धेत रौप्यपदक मिळवलेल्या महेंद्रने जागतिक कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारल्यावर या स्पर्धेत तो पदकाचा रंग बदलेल अशी कुस्ती शौकिनांना आशा होती. तमाम कुस्तीशौकीनांचे डोळे त्याच्या कामगिरीकडे लागले होते मात्र इराणच्या अनुभवी मासुमीवाला समोर त्याचे आव्हान टिकले नाही. महेंद्रने आज रौप्यपदक मिळवले असले तरी खुल्या गटातून रौप्यपदक मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी आज त्याच्या नावावर झाली आहे.
महेंद्र पुण्यातील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ही त्याची दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. एशियन चँम्पियनशीप आणि जागतिक कुस्ती स्पर्धेत सलामीलाचा अंतिम फेरीपर्यंत धडक मारण्याची धडाकेबाज कामगिरी त्याने केली आहे. त्याच्या यशाबद्दल कुस्ती शौकीनांनी महेंद्रचे कौतुक केले आहे.