ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
बंगालमधील न्यू जलपाईगुडी येथे मंगळवारी वन्यजीव तस्करांकडून एक बिबट्याची आणि दोन लाल पांडाची कातडी जप्त करण्यात आली. हे तिन्ही आरोपी नेपाळचे नागरिक असून त्यांना अटक करण्यात येऊन बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्राथमिक तपासातून असे समोर आले की, हे तिघे वन्यजीव शिकारी आणि भूतान तसेच चीन मधील ग्राहक यांच्यात दुवा साधण्याचे काम करत होते.
नेपाळमधील मिक्वाखोला येथून कातडे गोळा करून ते भारतात आले होते. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यानंतर त्यांनी उत्तर बंगालमधील पानीटंकी येथे तस्करीचा माल ठेवला होता. माल पोहोच करण्यासाठी ते जायगावमार्गे भूतानला जाणार होते.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “सुरक्षा एजन्सीच्या वन्यजीव शाखांना सतर्क करण्यात आले असून या तस्करीच्या वस्तूंचे नमुने विश्लेषणासाठी भारतीय प्राणीशास्त्र विभागाकडे पाठवण्यात आले आहेत.” “अलिकडच्या काळात जप्त केलेली ही पहिली लाल पांडाची कातडी असून आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. नेपाळमधून कातडे भारतात तस्करीचा माल घेऊन दाखल झालेले हे आरोपी भूतानमधील फुंटशोलिंग येथे जाण्याच्या तयारीत होते. या कातड्यांची किंमत 30 लाख रुपये असून ती चीनला पाठवण्यात येणार होती.” असे वरिष्ठ वन अधिकाऱ्याने सांगितले.