ऑनलाईन टीम/तरुण भरत
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of Legislature) उद्यापासून सुरू होत आहे. जवळपास दीड महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) विरोधकांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार, खातेपाटप ते अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर करण्यासही झालेला विलंब अशा विविध प्रश्नांवर विरोधी पक्ष सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पहिल्याच अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये (Mumbai) उद्यापासून सुरु होणार अधिवेशन २५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. तर प्रत्यक्षात अधिवेशनाचे कामकाज सहा दिवसच चालणार आहे. १९ ऑगस्टला गोपाळकाला असल्याने दोन्ही सभागृहांना सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे. तसेच, शनिवार आणि रविवारीही सुट्टी असल्याने कामकाज होणार नाही. शिवाय, २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित सहा दिवस राज्यातील पूरस्थिती, शेतकऱ्यांच्या प्रश्नासह अन्य प्रश्नांवर सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेवर येताच आधीच्या ठाकरे सरकारच्या काळातील अनेक निर्णयांना स्थगिती दिली तर, काही निर्णय फिरवले आहेत. त्यात बहुतांश निर्णय हे शिवसेनेशी निगडीत असल्याने शिवसेना जास्त आक्रमक होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेता शिवसेनेचा असल्याने तिथे सत्ताधारी शिवसेना विरुद्ध विरोधक शिवसेना असे चित्र पाहायला मिळेल.
हे ही वाचा : सुधीर मुनगंटीवार अन् आता नाना पटोले चर्चेत; भाजपच्या ‘वंदे मातरम्’नंतर, काँग्रेसचं ‘जय बळीराजा
चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता
प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचे आयोजन केले जाते. आजही सायंकाळी पाच वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावर विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास हे अधिवेशन वादळी ठरण्याची ती नांदी असेल.
या कार्यक्रमानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून खातेवाटपानंतरची ही पहिलीच बैठक असेल. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होईल.