ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मध्यरात्री 12.01 मिनिटांनी ठाण्याच्या शिवसेना शाखेत ध्वजारोहण करत 40 वर्षांची परंपरा कायम ठेवली.
ठाणे शहरातील तलावपाली भागात शिवसेनेची शाखा आहे. आनंद दिघे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरू केली होती, तीच परंपरा आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर देखील कायम ठेवली. या ध्वजारोहण कार्यक्रमाला मोठ्या संख्यने शिंदे समर्थक उपस्थित होते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे गटात असलेले खासदार राजन विचारे यांना पोलिसांनी नोटीस देऊन देखील त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते देखील आमने-सामने आल्याने काही वेळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्याच्या शिवसेना शाखेच्या प्रांगणात मध्यरात्री ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रध्वजाला वंदन करून उपस्थितांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.








