वार्ताहर/ मडकई
बांदोडा, कवळे व दुर्भाट पंचायतींच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देत मतदारांनी नवीन चेहऱयांना संधी दिली आहे. विजयी उमेदवारांमध्ये काहीजण मंत्री सुदिन ढवळीकर व मगो नेते मिथील ढवळीकर यांचे समर्थक आहेत. बऱयाच प्रभागांमध्ये अनपेक्षीत निकाल लागला आहे. आत्तापर्यंत बऱयाच विजयी उमेदवारांनी मंत्री सुदिन ढवळीकर व मिथील ढवळीकर यांची भेट घेऊन सरपंच व उपसरपंचपदासाठी त्यांच्याशी चर्चा केली.
पुढील पाचवर्षे पंचायतीचा कारभार स्वच्छ व पारदर्शक ठेऊन नागरिकांची कामे झटपट मार्गी लावण्याचा सल्ला मंत्री ढवळीकर यांनी नव्याने निवडून आलेल्या उमेदवारांना दिला. विकासकामत सरकारी पातळीवरुन व माधवराव ढवळीकर ट्रस्टच्या माध्यमातून सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. बांदोडा पंचायतीमधून सुखानंद गावडे, राजू बांदोडकर, अजय नाईक, वामन नाईक, मुक्ता नाईक, मनीषा कुर्पासकर, चित्रा फडते, व्यंकटेश गावडे व रामचंद्र नाईक यांनी, कवळे पंचायतीमधून सुशांत कपिलेश्वरकर, सोनाली तेंडुलकर, प्रिया डोहीफोडे, विठोबा गावडे, सत्वशिला नाईक व मनुजा नाईक यांनी तर दुर्भाट पंचायतीमधून अमृता श्रीकांत नाईक, चंदन नाईक, शिवदास गावडे, दीपा नाईक, क्षिप्रा आडपईकर व गौरीश नाईक यांनी मंत्री सुदिन ढवळीकर व मिथील ढवळीकर यांची भेट घेतली.









