सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा
व्हेंटिलेटर हटविण्यात आला ः न्यूयॉर्कमध्ये झाला होता जीवघेणा हल्ला
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
न्यूयॉकमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. त्यांना आता व्हेंटिलेटरची गरज नसल्याचे समजते. तसेच बोलू शकत असल्याचा दावा करण्यात येतोय. तर रश्दी यांच्यावर हल्ला करणाऱया आरोपीने न्यायालयात स्वतः निर्दोष असल्याचे म्हटले आहे.
रश्दी यांच्यावर शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान 24 वर्षीय हादी मातरने हल्ला केला होता. मातरने त्यांच्या गळय़ावर चाकूने 10-15 वेळा वार केले होते. या हल्ल्यानंतर रश्दी यांना एअरलिफ्ट करत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मातर हा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्सबद्दल सहानुभूती बाळगून होता. रश्दी यांच्या गळय़ावर तसेच पोटावर चाकूने अनेक वार करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची एका डॉक्टरने सांगितले आहे.
मातर विरोधात हत्येचा प्रयत्न तसेच मारहाणीचा आरोप ठेवण्यात आला आहे. तो इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉपर्सबद्दल सहानुभूती बाळगून असल्याचे सोशल मीडिया अकौंट्समधून समोर आले आहे. मातर कॅलिफोर्नियात जन्मला होता, परंतु अलिकडेच तो न्यू जर्सी येथे स्थलांतरित झाला होता. त्याच्याकडून एक बनावट ड्रायव्हिंग लायसन्स हस्तगत करण्यात आले आहे.
33 वर्षांपूर्वी फतवा
सलमान रश्दी हे मुस्लीम परंपरांवर लिहिलेली कादंबरी ‘द सॅटेनिक व्हर्सेस’मुळे वादात सापडले होते. इराणचे धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी यांनी 1989 मध्ये त्यांच्या विरोधात फतवा जारी केला होता. या हल्ल्याकडे याच फतव्याला जोडून पाहिले जात आहे. परंतु या हल्ल्याशी आमचा कुठलाच संबंध नसल्याचा दावा इराणच्या एका मुत्सद्याने केला आहे.
रश्दी यांचा जन्म 19 जून 1947 रोजी मुंबईत झाला होता. 75 वर्षीय सलमान रश्दी यांना स्वतःच्या साहित्याद्वारे जागतिक ओळख प्राप्त झाली. स्वतःची दुसरीच कादंबरी ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’साठी 1981 मध्ये ‘बुकर’ तर 1983 मध्ये ‘बेस्ट ऑफ द बुकर्स’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले हेते. द जग्वार स्माइल, द मूर्स लास्ट साई, द ग्राउंड बिनीथ हर फीट आणि शालीमार द क्लाउन या त्यांच्या कादंबऱया प्रसिद्ध आहे.
अनेक देशांमध्ये बंदी
‘द सॅटेनिक व्हर्सेस’ ही रश्दी यांची चौथी कादंबरी होती. भारत आणि जगातील अनेक देशांमध्ये यावर बंदी आहे. या कादंबरीचे जपानी अनुवादक हितोशी इगाराशी यांची हत्या करण्यात आली होती. तर इटालियन अनुवादक आणि नॉर्वेतील प्रकाशकावरही हल्ले झाले. रश्दी यांचे कौतुक केल्याने दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या लेखिका जॅनब प्रिया यांच्यावरही जीवघेणे हल्ले झाले होते.









