22 रोजी निवड, आदेश जारी, 62 सरपंच, 64 उपसरपंचपदे महिलांसाठी राखीव
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील 186 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक शांततेत पार पडल्यानंतर आता येत्या दि. 22 रोजी सरपंच-उपसरपंच यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासंबंधी पंचायत संचालनालयाने आदेश जारी केला आहे.
सरपंच-उपसरपंच निवडीसाठी सरकारी यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक पंचायतीनुसार निवडणूक अधिकारीही निश्चित करण्यात आले आहेत. राज्यातील 62 सरपंचपदे महिलांसाठी राखीव आहेत. त्यातील उत्तर गोव्यात 33 आणि दक्षिण गोव्यात 29 सरपंच महिला असतील. त्याशिवाय उपसरपंचपदासाठी 64 जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यात उत्तर गोव्यात 35 तर दक्षिणेत 29 जाग्यांचा समावेश आहे. उर्वरित पंचायतींमधील सरपंच-उपसरपंच ही पदे खुली ठेवण्यात आली आहेत.
निवड झालेल्या पंचसदस्यांना सरपंच-उपसरपंच बनण्याचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरूही झाली असून पंचायत मंडळांमधून दोन्ही पदांवर योग्य व्यक्तीची निवड होणार आहे. दि. 22 रोजी या निवडीवर शिक्कामोर्तब होणार असून पंचायत संचालकांनी तसा आदेश जारी केला आहे.
दरम्यान, बहुतेक पंचायत मंडळे मंत्री आमदार यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे पंचसदस्यांनी सरपंच-उपसरपंच बनण्याचे कितीही खटाटोप केले, कितीही इच्छा व्यक्त केली तरीही संबंधित मंत्री आमदारांची मर्जी संपादन केल्याशिवाय त्यांचे पान हलणार नाही हे आधीच निश्चित झालेले आहे. परिणामस्वरूप संबंधित स्थानिक मंत्री-आमदार यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
पराभवाला जबाबदार एकच तर विजयाला मालक अनेक, असे म्हणतात. त्या न्यायाने सध्या विजयी झालेले पंचसदस्य हे आपलेच असल्याचे दावे सत्ताधाऱयांसह विरोधकही करत आहेत. त्यातून या पंचसदस्यांना स्वतःच्या गटात ओढून पॅनल स्थापन करण्यासाठी चढाओढ निर्माण झाली आहे. परंतु विरोधकांशी एकनिष्ठ असलेले पंचसदस्य वगळता अन्य सर्वजण सत्तेच्या छायेत राहण्याचेच प्रयत्न करतील हे ठरलेले आहे.
अनेक पंचायतींमधून माजी मंत्री-आमदार यांचेही समर्थक मोठय़ा संख्येने विजयी झाले आहेत. केपेत माजीमंत्री बाबू कवळेकर, लोलयेत माजी आमदार इजिदोर फर्नांडिस यांचे पॅनल विजयी झाले आहे. त्यामुळे साहजिकच तेथे सत्ताधाऱयांची डाळ शिजणार नाही हेही निश्चित आहे. याऊलट कळंगुटमध्ये मायकल लोबो यांचे पॅनल हरले आहे. त्यामुळे तेथील विजयी उमेदवार कुणाची कास धरतात हेही पहावे लागणार आहे.









