मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सुरू झालेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राज्यात 1 कोटी 8 लाख राष्ट्रध्वजांचे वितरण करण्यात आले आहे. प्रत्येक ग्राम पंचायतीला 400 ते 500 ध्वज वितरीत करण्यात आले होते. विविध संघ-संस्थांनीही ध्वज पुरविले आहेत. त्यामुळे राज्यात सुमारे 1 कोटी 20 लाख राष्ट्रध्वज वितरीत झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली.
बेंगळूरच्या आर. टी. नगर येथील निवासस्थानी ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे राज्यात उत्सवाचे वातावरण आहे. 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावा, अशी आपली इच्छा आहे. राज्य सरकारने 1 कोटी 8 लाख ध्वजांचे वितरण केले आहे. सर्व भारतीय एक आहेत, हा संदेश जनतेमध्ये रुजविणे हा तिरंगा अभियानामागील मुख्य उद्देश आहे. सर्वांनी जात, पंथ, धर्म असा भेद न करता स्वातंत्र्योत्सव साजरा करावा, अशी हाक मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिली.









