औरंगाबाद :
महावितरण कंपनीकडून एप्रिल ते जून या तीन महीन्यात १३१ कोटी रूपयांची वीजचोरी उघडकीस आणल्याची माहिती समोर आली आहे. ही वीज चोरी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात झाली असून त्यांच्यावर महावितरण कंपनीकडून कारवाई चालू आहे.
महावितरणचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक विजय सिंघल यांच्या निर्देशानुसार गेल्या काही महीन्यात भरारी पथकाकडून वीजचोरी विरोधात राज्यभर विविध ठिकाणी ठापे टाकण्यात आले. या कारवाईत वीजचोरीच्या २६२५ प्रकरणासह इतर अनियमितता आढळून आली आहे.
महावितरणकडून या कारवाई साठी ८ अंमलबजावणी युनिट तयार केली असून त्यामध्ये ६३ पथकांचा समावेश आहे. या पथकांना वीजचोरीसह सुरक्षिततेसाठी नियुक्त केल्याचे महावितरणकडून कळवले आहे.
प्रत्येक पथकाला वीजचोरीची २० प्रकरणे प्रतिमहिना उजेडात आणण्याचे उद्दीष्ट दिले असून या पथकाकडून आतापर्यंत ५२.२ कोटींच्या वीजचोरीचा महसूल जमा झाल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.