प्रतिनिधी /बेळगाव
काळी आमराई येथील सहय़ाद्री आंतरराज्य बहुउद्देशीय सहकारी संस्थेची सन 2021-22 ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 7 रोजी उत्साहात पार पडली. क्लब रोड येथील ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन एम. बी. निर्मळकर होते. व्यासपीठावर ज्येष्ठ सल्लागार ऍड. राजाभाऊ पाटील, माजी चेअरमन प्रा. विक्रम पाटील, व्हाईस चेअरमन विजय भोसले आदी उपस्थित होते.
प्रारंभी विचारवंत व दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. एन. डी. पाटील, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासह वर्षकाळात मयत झालेल्या सभासद हितचिंतक व इतर व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. चेअरमन एम. बी. निर्मळकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून वार्षिक अहवाल सादर केला. संस्थेचे वसूल भागभांडवल 1 कोटी 54 लाख 63 हजार, राखीव व इतर निधी 15 कोटी 27 लाख 14 हजार, ठेवी 186 कोटी 90 लाख 55 हजार, कर्जे 128 कोटी 47 लाख 63 हजार, गुंतवणूक 50 कोटी 30 लाख 28 हजार असून संस्थेने 206 कोटी 47 लाखाच्या भाग भांडवलाच्या आधारे 715.54 कोटींची उलाढाल करत संस्थेला 1 कोटी 3 लाख 28 हजार 882 रुपये इतका निव्वळ नफा झाल्याची माहिती दिली. यावेळी ऍड. राजाभाऊ पाटील व प्रा. विक्रम पाटील यांनी मार्गदर्शन केले.
सह-सेक्रेटरी एम. आर. निलजकर यांनी मागील सभेचा वृत्तांत सादर केला. सेक्रेटरी ए. जे. कणबरकर यांनी सर्व विषयांची मांडणी केली. विनायक गवस यांनी ऑडिट रिपोर्टचे वाचन केले तर शाखा व्यवस्थापक के. आर. पाटील, एम. व्ही. गंधाडे व आर. एस. पाटील यांनी शाखांचा अहवाल सादर केला. सभेमध्ये सभासदांच्या गुणी मुलांचा, उत्तम कामगिरी केलेल्या शाखांचा व उच्चतम पिग्मी संकलन केलेल्या पिग्मी कलेक्टरांचा सत्कार करण्यात आला.
सभेला संचालक एन. बी. खांडेकर, आर. बी. बांडगी, पी. पी. बेळगावकर, प्राचार्य आनंद पाटील, शिवाजी कदम, किरण पाटील, गोपाळ कातकर, शिवाजी आढाव, एच. एम. कांबळे, संचालिका सुजाता मायाण्णाचे, शीतल कोकितकर, मराठा बँकेचे संचालक बाळाराम पाटील, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटीलसह अनेक मान्यवर, सभासद व हितचिंतक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









