ऑनलाईन टीम/तरुण भारत
बिहारमध्ये राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Bihar CM Nitish Kumar) आणि भाजप यांच्यात दुरावा वाढत आहेत. सध्या नितीश कुमार आणि भाजपचे (BJP) संबंध तुटण्याएवढे ताणले गेल्याने राज्यात राजकीय वादळ घोंघावू लागले आहे. नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करण्याची दाट शक्यता आहे. तर रविवारी झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीलाही नितीश कुमारांनी पाठ फिरविली होती.
दरम्यान, बिहारमध्ये २०२० च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि जेडीयूमध्ये राजकीय वाद निर्माण झाला. ज्यामुळे दोन्ही पक्षांमधील तणाव वाढला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील जागा वाटपावरून सर्वप्रथम जेडीयू आणि भाजपमध्ये वाद उफाळून आला. ज्यानंतर जेडीयू (JDU) आणि भाजपमधील राजकीय वाद वाढत गेले. भाजपसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सकाळी ११ वाजता जेडीयूच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. जेडीयू पक्षाचे अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ लालन यांनी सोमवारी ही माहिती दिली. बिहारमधील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंग बाहेर पडल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज, मंगळवारी आमदार आणि खासदारांची बैठक आयोजित केली आहे. अशी माहिती राजीव रंजन सिंह उर्फ लालन यांनी दिली आहे. परंतु त्यांनी नितीश कुमार भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याच्या विचारात असल्याच्या वृत्तावर भाष्य करणे टाळले.
दुसरीकडे, विरोधी पक्ष असलेल्या तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलानेही आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडल्यास त्यांच्याशी आघाडीची तयारीही राष्ट्रीय जनता दलाने दर्शवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत बिहारमध्ये नवी राजकीय समीकरणे जुळून येण्याची दाट शक्यता आहे.
तर, राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांच्या वक्तव्यातूनही नव्या राजकीय आघाडीचे संकेत मिळाले आहेत. दोन्ही पक्षांच्या आमदारांच्या बैठका बोलावल्या जाणे, ही राजकीय परिस्थिती सर्वसाधारण नाही, असे सूचक विधान तिवारी यांनी केले. तिवारी म्हणाले की नेमके काय चालले आहे, याची व्यक्तिश: मला कल्पना नाही, परंतु विधानसभेच्या अधिवेशनाची घोषणा झालेली नसताना आमदारांचे पुरेसे संख्याबळ असलेल्या दोन पक्षांनी आपल्या आमदारांच्या बैठका बोलावणे या वस्तुस्थितीकडे आपण काणाडोळा करू शकत नाही.
नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडणार असतील तर आमचा पक्ष त्यांना भाजपच्या विरोधात लढण्यासाठी त्यांना जवळ करेल, असेही तिवारी यांनी स्पष्ट केले.