डेनेज वाहिन्या घातल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष : सर्वत्र चिखलाचे साम्राज्य, वाहनधारकांचे हाल

प्रतिनिधी /बेळगाव
शहापूर पोलीस लाईन मागील बाजूस असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. डेनेज वाहिन्या घातल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने रस्ता खराब झाला असल्याची आरोप नागरिक करीत आहेत. रस्त्यावरून ये-जा करणे मुश्किल बनले असल्याने रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बॅ. नाथ पै चौकामधून पोलीस लाईनजवळून वडगावकडे जाणाऱया रस्त्याच्या मध्यभागी चरी खोदून डेनेज वाहिन्या घालण्याचे काम करण्यात आले होते. डेनेज वाहिन्या घातल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची आहे. पण कंत्राटदाराने रस्त्याची दुरुस्ती केली नसल्याने संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. रस्त्याच्या मध्यभागी चर निर्माण झाल्याने चारचाकी वाहने अडकून पडत आहेत. तसेच दुचाकी वाहने घसरून पडत असल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. येथील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. पण याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी स्थानिक रहिवाशांनादेखील अडचणीचे बनले आहे. सध्या रस्ता खुपच खराब झाला असून ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. तर काही ठिकाणी चिखल निर्माण होवून वाहनधारकांना अडचणीचे ठरते. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकूंतन होत आहे.









