प्रतिनिधी /फातोर्डा
आकें सार्वजनिक गणेशोत्सव युवक मंडळाच्या देणगी कूपन विक्री दालनाचे उद्घाटन नुकतेच नगरसेवक व उद्योजक घनश्याम प्रभू शिरोडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मडगावचे उद्योजक आदेश कारवारकर आणि मंदार प्रभू शिरोडकर हे खास अतिथी म्हणून उपस्थित होते.
घनश्याम शिरोडकर यांनी मंडळ करत असलेल्या कार्याचा गौरव करून यापुढेही आपले संपूर्ण सहकार्य मंडळाला राहील, असे सांगितले तसेच मंडळ बांधत असलेल्या मंदिरासाठी 5 लाख रुपयांची मदत वस्तूरूपाने करण्याचे आश्वासन दिले. आदेश कारवारकर यांनी मंडळाच्या कुठल्याही कामासाठी त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले व यंदा नेत्रचिकित्सा शिबिर मंडळामार्फत घेण्याचे आश्वासन दिले
यावेळी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र कोरगावकर, माजी अध्यक्ष दामोदर बोरकर, सचिव मंगलदास शिरोडकर, खजिनदार संदेश नाईक, ऋत्विक पुजारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. रवींद्र कोरगावकर यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला व देणगी कुपने घेऊन मंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. स्वागत व सूत्रसंचालन मंगलदास शिरोडकर यांनी केले, तर आभार संदेश नाईक यांनी मानले.









