वृत्तसंस्था/ लॉस कॅबोस
रशियाचा टेनिसपटू डॅनिल मेदवेदेव्हने येथे सुरू असलेल्या एटीपी 250 दर्जाच्या लॉस केबोस पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीची अंतिम फेरी गाठल्याने त्याने एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत आपले अग्रस्थान अधिक मजबूत केले आहे. आगामी अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत खेळण्यासाठी तो न्यूयॉर्कमध्ये यापुर्वीच दाखल झाला आहे.
मध्यंतरी रशिया आणि युक्रेन यांच्यात तणावग्रस्त परिस्थितीमुळे उद्भवलेल्या युद्धाने विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत रशियाच्या टेनिसपटूवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे तो विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळू शकला नाही. मेक्सिकोमध्ये सुरू असलेल्या लॉस कॅबोस टेनिस स्पर्धेत 26 वर्षीय मेदवेदेव्हने एकेरीची अंतिम फेरी गाठताना सर्बियाच्या केमॅनोविकचा उपांत्य सामन्यात 7-6 (7-0), 6-1 असा पराभव केला. 2022 च्या टेनिस हंगामातील जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत मेदवेदेव्हन्ला अंतिम लढतीत स्पेनच्या नादालकडून पराभव पत्करावा लागला होता. मेक्सिकोतील स्पर्धेत मेदवेदेव्ह आणि ब्रिटनचा नुरी यांच्यात अंतिम लढत होईल. या स्पर्धेतील विद्यमान विजेता नुरीने कॅनडाच्या फेलिक्स ऍलीसिमेचा 6-4, 3-6, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.









