गोवा महिला काँग्रेस अध्यक्ष बीना नाईक यांचा घणाघात
प्रतिनिधी/ पणजी
एखाद्या अधिकाऱयाच्या बेजबाबदारपणामुळे सुमारे 3.5 कोटी रुपये किंमतीची तुरडाळ आणि सुमारे 10 टन साखरेची नासाडी होणे ही बाब धक्कादायक आहे. या प्रकारास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार जबाबदार असून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी धडपडणाऱया महिलांचा भाजप सरकारला ‘शाप’ लागेल, असा घणाघात गोवा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक यांनी केला आहे.
शनिवारी त्या पणजीत पत्रकारांशी बोलत होत्या. तुरडाळ आणि साखरेच्या नासाडीस जबाबदार असलेले मंत्री आणि अधिकाऱयांना तत्काळ बडतर्फ करावे, तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी नाईक यांनी केली.
आजही खुल्या बाजारात तुरडाळीचा भाव 100 रुपये किलोपेक्षा जास्त आहे. कोरोनाकाळात तो तब्बल 200 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला होता. अशावेळी लोकांची ही धडपडत दिसत असतानाही बेफिकीर भाजप सरकारने तुरडाळ गोदामात सडू दिली हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे नाईक म्हणाल्या.
हा प्रकार एवढय़ावरच न थांबता गोदामातील साखरही वितळल्याच्या वृत्ताने भाजपची असंवेदनशीलता पुन्हा एकदा उघड झाली आहे. कोटय़वधी भारतीयांचे पोट भरण्यासाठी राबणाऱया शेतकऱयांच्या कष्टाची सरकारला किंमत नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे, असे नाईक यांनी म्हटले आहे.
प्रधानमंत्री मोदींच्या क्रोनी क्लबमधील खासगी कंपन्यांना डाळ-साखर सारख्या वस्तू आयात करून माया कमावण्यासाठी जाणूनबुजून अन्नपदार्थ खराब होऊ दिले जातात. मोदी सरकार आपल्या क्रोनी क्लबची तिजोरी भरण्यासाठी जनतेचा पैसा वापरत आहे, अशी टीकाही नाईक यांनी केली.









