बर्मिंगहम / वृत्तसंस्था
अष्टपैलू स्नेह राणाने डेथ ओव्हर्समध्ये दडपण उत्तमरित्या हाताळत लक्षवेधी योगदान दिल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने राष्ट्रकुल क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा 4 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. विजयासाठी 165 धावांचे आव्हान असताना इंग्लंडचा संघ एकवेळ 3 बाद 132 अशा मजबूत स्थितीत होता. यजमान संघाला शेवटच्या 24 चेंडूत केवळ 33 धावांची गरज होती. पण, ऑफस्पिनर राणाने (4-0-28-2) भेदक मारा साकारत इंग्लंडची संधी हिरावून नेली.
राणाने डावातील 18 व्या षटकात केवळ 3 तर शेवटच्या षटकात फक्त 9 धावा दिल्या. इंग्लंडला 6 बाद 160 धावांवर समाधान मानावे लागले. सोफी इक्लेस्टोनने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला असला तरी इंग्लंडला विजयापासून 4 धावांनी दूरच रहावे लागले. या निकालाच्या माध्यमातून हरमनप्रीत कौरने 2017 वनडे वर्ल्डकप फायनलमधील इंग्लंडविरुद्ध पराभवाचा चांगलाच वचपा काढला.
संक्षिप्त धावफलक
भारत ः 20 षटकात 5 बाद 164 (स्मृती मानधना 32 चेंडूत 8 चौकार, 3 षटकारांसह 61, जेमिमा रॉड्रिग्यूज 31 चेंडूत 44. अवांतर 2. प्रेया केम्प 2-22, ब्रन्ट, स्कीव्हर प्रत्येकी 1 बळी).
इंग्लंड ः 20 षटकात 6 बाद 160 (नॅट स्कीव्हर 43 चेंडूत 41, डॅनी वॅट 35, ऍमी जोन्स 24 चेंडूत 31. स्नेह राणा 2-28, दीप्ती शर्मा 1-18).









